दरम्यान, तीन कामगार, एक स्वयंपाकी आणि एका छायाचित्रकाराला जामीन मंजूर करण्यात आला आहे.पार्टीत ड्रगचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून स्थानिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी सखोल तपास केला जाणार आहे.मुंबई स्थित ड्रग्ज पेडलरचे नाव तपासात निष्पन्न झाले असून याप्रकरणी हिनासह अन्य संशयितांची एलसीबीकडून कसून चौकशी केली जाणार आहे.
पार्टी झालेले स्काय ताज व त्याला लागून असलेला एक आलिशान बंगलाही सील करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा मारुन अभिनेत्री हिनासह परदेशी महिला, हिंदी आणि तेलगू चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री, कोरिओग्राफर यांना अटक केली होती. पोलिस निरीक्षक समाधान नागरे व त्यांच्या पथकाने सोमवारी इगतपुरी न्यायालयात २५ संशयितांना हजर केले.
न्यायाधीश पी. पी.गिरी यांच्यासमोर सरकारी वकील मिलिंद निर्लेकर यांनी सर्व संशयित आरोपींनी अमली व मादक पदार्थ बाळगत ते सेवन केल्याप्रकरणी व वापराबाबत अधिक तपास करण्यासाठी त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात यावे, असा युक्तिवाद केला.न्यायालयाने पाच जणांचा जामीन मंजूर केला. उर्वरित आरोपींना एका दिवसाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.