'फरार' परमबीर सिंग मुंबईत दाखल, पुढे काय करणार?

गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (12:35 IST)
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल झाले आहेत. ते सध्या कांदिवलीच्या क्राईम ब्रॅंचच्या ऑफिसमध्ये आहेत.
 
पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या परमबीर सिंग यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. तो मान्य करून मुंबईच्या मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं.
 
तर परमबीर सिंग हे देशातच आहेत आणि ते फरार नाहीयेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती.
 
परमबीर सिंग यांना मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने ते लपून बसले आहेत, असं सिंग यांच्या वकिलानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं.
 
परमबीर सिंग यांनी अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे.
 
याआधी सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंग यांच्या वकिलांना ते कुठे आहेत याची माहिती द्या, असं सांगितलं होतं.
 
तुम्ही कुठे आहात याची माहिती जोपर्यंत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही सुनावणी होणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं होतं.
 
परमबीर सिंग यांची सुरक्षेची मागणी करणारी याचिका पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून दाखल करण्यात आली होती.
 
गेल्या आठवड्यात जस्टिस एस के कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं होतं, "तुम्ही सुरक्षेची मागणी करत आहात आणि कोणाला माहितही नाही की, तुम्ही कुठे आहात? जर तुम्ही परदेशात आहात आणि पॉवर ऑफ अटॉर्नीचा आधार घेत आहात का? जर न्यायालयानं तुमच्या बाजूने निर्णय द्यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही भारतात यायला हवं. तुम्ही कुठे आहात, हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही सुनावणी करणार नाही."
 
परमबीर सिंह कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही, वारंवार समन्स बजावून ते चौकशीला हजर राहत नाहीत, त्यांच्या कोणत्याही पत्यावर ते उपलब्ध नाहीत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर कोर्टाने सरकारी वकिलांच्या बाजूने निर्णय दिला.
 
परमबीर सिंग यांना फरार घोषित करून आता पुढील तपास त्या दिशेने होईल, असं पोलिसांनी म्हटलं.
 
पण कोणत्याही प्रकरणातील एखाद्या आरोपीला नेमकं कधी फरार घोषित केलं जातं? त्यानंतरची कायदेशीर कार्यवाही नेमकी कशा प्रकारे केली जाते? हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे.
 
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंह हे पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीला सिंह यांनीच माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता.
 
मात्र सचिन वाझे प्रकरणात सिंह यांचं नाव पुढे आल्यानंतर त्यांच्यावरही आरोप झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांनी वैद्यकीय सुटी घेतली. तेव्हापासून ते गायब आहेत, असं बोललं जाऊ लागलं.
 
कोर्टात परमबीर सिंग हजर राहत नव्हते. त्याचबरोबर त्यांना बजावण्यात आलेल्या समन्सना उत्तर देत नव्हते.
 
यामुळे परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याबाबत गुन्हे शाखेकडून कोर्टात मागणी करण्यात आली. ती कोर्टाने मान्य केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती