एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ, संप मिटणार का?

बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (21:39 IST)
एसटीचा संप मिटावा यासाठी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.
 
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने संघटनांना दिला आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार १२ ते साडेबारा हजार आहे त्यांना आता १७ हजार ते साडेसतरा हजार रुपये पगार मिळणार आहे.
 
एसटी कर्मचाऱ्यांसोबत परब यांनी चर्चा केली. त्यानंतर परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर परब हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले. नव्या प्रस्तावामुळे राज्य सरकारवर ६०० कोटी रुपयांचा भार येणार आहे.
 
एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळी ८ वाजता कामावर यावे. सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि सेवा समाप्ती मागे घेणार असल्याची ग्वाही परब यांनी दिली आहे. परब म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांची सेवा १ ते १० वर्षे आहे त्यांच्या मूळ वेतनात ५ हजार रुपयांची वाढ होणार आहे. परिणामी, १२ हजारांचा पगार १५ हजारांवर जाणार आहे. तर, १७ हजारांचा पगार २४ हजारांवर जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या १० तारखेच्या आत करण्यात येईल, असे ठोस आश्वासन परब यांनी दिले आहे.
 
एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नाही. त्यात अनेक अडचणी आहेत. समितीच्या अहवालानंतर ठोस निर्णय घेतला जाईल. संपामुळे प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींचे हाल होत आहेत. हे योग्य नाही. सरकार कर्मचाऱ्यांसोबतच आहे. त्यामुळे संप मागे घेण्याची कळकळीची विनंती करीत आहोत, असे परब म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती