या 'घोड्या'ला शोधून द्या, स्विगीची आपल्याच ग्राहकांना 'ऑर्डर'

बुधवार, 6 जुलै 2022 (19:32 IST)
प्रत्येक कंपनी आपल्या उत्पादनांची, सेवेची जाहिरात करण्यासाठी धडपडत असते. त्यातही फुकटात जाहिरात होत असेल तर कंपन्या आणखीच खुश होतात.
 
पण एक कंपनी मात्र अशा फुकटात झालेल्या जाहिरातीने चांगलीच बेचैन झाली आहे. एक माणूस आणि चक्क एक प्राणी अप्रत्यक्षपणे का होईना आपली जाहिरात करतोय आणि त्यावर लोक प्रश्न विचारतायत आणि तो माणूस आपल्या ओळखीचा नाही ही स्थिती या कंपनीला अस्वस्थ करत आहे.
 
पण अशा स्थितीचा फायदाही काही कंपन्या घेतात. चर्चेमध्ये आलोच आहोत तर ही चर्चा तितक्याच खुसखुशीत पद्धतीने वाढवण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे.
 
ही कंपनी आहे स्विगी. खाद्यपदार्थांचं ग्राहकांपर्यंत वितरण करणे हे या कंपनीचं काम.
 
काही दिवसांपूर्वी एक लहानसा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. यात एक व्यक्ती पांढऱ्या घोड्यावर बसलेला असून त्याच्या पाठीला स्विगीचे डिलिव्हरी बॉय लावतात ती काळी बॅग लावलेली आहे. या व्हीडिओबरोबर स्विगी आता घोड्यावरुन फूड डिलिव्हरी करत असल्याची टिप्पणी त्यात केलेली होती. तसेच हा व्हीडिओ मुंबईच्या दादर परिसरातील असल्याचंही म्हटलं होतं.
 
झालं. व्हीडिओ पाहताच स्विगीच्या सोशल मीडियावर असलेल्या ग्राहकांच्या कल्पनाशक्तीला उकळ्या फुटू लागल्या. एरव्ही अन्नासाठी अर्धा, पाऊण तास वाट पाहणारे ग्राहक क्षणाचाही विलंब न लावता दणादण व्यक्त होऊ लागले.
 
त्यांनी स्विगीला या हिरोला बक्षीस द्यावं असंही सुचवलं. पण अशा अनेक सूचनांमुळे स्विगी आणखीच गोंधळली. हा कोण अनोळखी ब्रँड अँबेसडर मुंबईत घोड्यावरुन फिरतोय हे त्यांच्या लक्षात येईना.
 
शेवटी स्विगीनेही आपल्या ग्राहकांच्याच भाषेत खुमासदार पत्र लिहून सोशल मीडियात प्रसिद्ध केलंय.
 
या पत्रात त्यांनी लोकांना या 'घोड्या'ला शोधून देण्याची विनंती केलीय.
 
स्विगीनं पत्रात काय म्हटलंय?
 
या पत्रात स्विगी म्हणतेय आम्हालाही हा हिरो कोण आहे याचाच प्रश्न पडलाय. तो ज्या घोड्यावर आहे तो तुफान घोडा आहे की बिजली घोडी ते आम्हालाही जाणून घ्यायचं आहे. त्याच्या बॅगेत काय आहे, मुंबईतला इतका गजबज असलेला रस्ता तो इतक्या निश्चयाने का ओलांडतोय? ऑर्डरची डिलिव्हरी देताना तो घोडा कोठे पार्क करतो असे प्रश्न आम्हालाही पडलेत त्याची उत्तरं जाणून घ्यायची आहेत.
 
या अक्सिडेंटल ब्रँड अँबेसेडरची माहिती देणाऱ्याच्या स्विगी मनीमध्ये 5 हजार रुपये जमा केले जातील असं आमिष कंपनीनं दाखवलं आहे.
 
इको फ्रेंडली डिलिव्हरीसाठी आम्ही प्रयत्न करतोय खरं पण आम्ही डिलिव्हरीसाठी घोडे, खेचर, गाढव, हत्ती, युनिकॉर्नसारखा कोणताही प्राणी नेमलेला नाही अशी गोड कबुलीही या पत्रात दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती