दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतः ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ॲक्शन मोडमध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात होते. “या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांशी सतत संपर्कात होतो. वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी मी त्यांना सूचना दिल्या आणि या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ही प्रत्यक्ष बोलून वीजपुरवठा तात्काळ सुरू होण्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून अवघ्या ७० मिनिटात दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला,”असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. “या प्रकरणाची गंभीर दखल मी घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल,”असेही डॉ. राऊत यांनी जाहीर केले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिल्याने माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यास विलंब झाला,असेही त्यांनी म्हटले आहे.
दक्षिण मुंबईसाठी ट्रॉम्बे ह्या मुख्य ग्रहण केंद्रामधून २२० kV कळवा – ट्रॉम्बे, मुलुंड – ट्रॉम्बे , सोनखर – ट्रॉम्बे, चेंबूर – ट्रॉम्बे, साल्सेट – ट्रॉम्बे १, साल्सेट – ट्रॉम्बे २ , चेंबूर – ट्रॉम्बे १ आणि चेंबूर – ट्रॉम्बे २ ह्या वाहिन्यांद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. MMRDA मेट्रो २ बी च्या कामा करता २२० kV सोनखर – ट्रॉम्बे आणि चेंबूर – ट्रॉम्बे वाहिनी नियोजनाप्रमाणे दिनांक ०४ / ०२ / २०२२ आणि ०५ / ०२ / २०२२ पासून बंद करण्यात आल्या आहेत. तसेच २२० kV साल्सेट – ट्रॉम्बे १ हि वाहिनी देखील मेट्रो ४ प्रकल्पाकरिता नियोजित कामाकरिता दिनांक २६ / ०२ / २०२२ रोजी २३ : 00 वाजता बंद केली होती. भार नियंत्रणाकरिता नेरुळ – चेंबूर आणि सोनखर – ट्रॉम्बे वाहिन्या एकत्र जोडल्या होत्या. त्या वेगळ्या करण्यासाठी २७ / ०२ / २०२२ रोजी सकाळी ७ वाजता नियोजित कामाकरिता बंद करण्यात आल्या होत्या. सकाळी ०८ : ४४ वाजता मुलुंड – ट्रॉम्बे हि वाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्या नंतर राज्य भार प्रेषण केंद्र ह्याने भार नियंत्रणाकरिता टाटा थर्मल आणि टाटा हायड्रो निर्मिती केंद्रांना ०९ : ३० वाजता निर्मिती क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले. तथापि DSM च्या VSE च्या माध्यमातून निर्मिती करण्यासाठी टाटा कडून मेल ची मागणी करण्यात आली. ह्या दरम्यान २२० kV कळवा – ट्रॉम्बे हि वाहिनी ०९ : ४९ वाजता BARC च्या कॅम्पसमध्ये वाहिनी खालील जंगलातील आगीमुळे तांत्रिक बिघाडामुळे हि वाहिनी बंद पडली. ह्याचा परिणाम ट्रॉम्बे – साल्सेट ह्या वाहिनीवर झाला आणि हि वाहिनी ओव्हरलोड होऊन बंद पडली. ज्यामुळे ट्रॉम्बे निर्मिती केंद्रावर अतिरिक्त भार येऊन वीज निर्मिती संच बंद पडले, परिणाम स्वरूप दक्षिण मुंबई ( कुलाबा, महालक्ष्मी आणि दादर ) परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झाला.
खालील प्रमाणे खंडित विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात आला.१० : ०५ वाजता २२० kV ट्रॉम्बे – साल्सेट वाहिनी पूर्ववत केल्यानंतर दक्षिण मुंबई मधील विद्युत पुरवठा कर्नाक, बॅकबे, परेल आणि महालक्ष्मी मधून १० :१३ पासून १० : ३० पर्यंत पूर्ववत करण्यात आला. संपूर्ण विद्युत पुरवठा ११ : १० वाजता पूर्ववत करण्यात आला. ट्रॉम्बे येथील विद्युत संच ७ हा १० : ५६ वाजता पूर्ववत केला. आणि ५०० मेगा वाट विद्युत संच ५ हा १३ : ०४ वाजता पूर्ववत केला व २५० मेगा वाट संच ८ हा १५ : ३० पर्यंत अपेक्षित आहे. तसेच महापारेषणच्या नेरुळ – चेंबूर, कळवा – ट्रॉम्बे, सोनखर – ट्रॉम्बे ह्या वाहिन्या अनुक्रमे १० : १६ , १० : २३ , ११ : ४९ वाजता पूर्ववत करण्यात आल्या. तसेच मुलुंड – ट्रॉम्बे ह्या वाहिनीच्या तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम BARC परिसरात चालू आहे.