पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम थंडीचा जोर, तापमानात मोठी घट

सोमवार, 24 जानेवारी 2022 (15:22 IST)
मुंबई : सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली आहे. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात काल घट झाली असल्याचं पाहिलं मिळाला. रविवारी सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट दिसून आली. कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ६ आणि ७ अंशांची घट झाली होती. हे गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे. कुलाबा येथे २१.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. यासोबतच रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ४३६ म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता. भांडुप येथे ३३६, माझगाव येथे ३७२, वरळी येथे ३१९, वांद्रे कुर्ला संकुल येथे ३०७, चेंबूर ३४७, अंधेरी ३४० असा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ नोंदवला गेला.
 
पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. सुमारे तास २०-३० किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
 
मुंबईत कालची रात्र सर्वाधिक थंडीची
देशभरात सुरू असलेल्या थंडीचा परिणाम मुंबईतही दिसून येत आहे. राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान १६ अंशांवर पोहोचले आहे. येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती