पाकिस्तानातील धुळीच्या वादळाचा मुंबईतल्या हवेवर परिणाम

सोमवार, 24 जानेवारी 2022 (10:24 IST)
पाकिस्तानात निर्माण झालेलं धुळीचं वादळ गुजरातवाटे महाराष्ट्रात पोहोचलंय. उत्तर कोकण आणि मुंबईला याचा मोठा फटका बसताना दिसतो. या धुळीच्या वादळानं मुंबई आणि परिसरात वातावरण सकाळपासूनच धुरकट बनलेलं आहे.
 
कालपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. त्यात आता धुळीचे कण मिसळल्यानं दृष्यमानता अजूनच कमी झालेली आहे. धुळीच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी दृष्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी झाल्याचे दृश्य होते. 
 
रविवारी सकाळपासूनच पुणे आणि मुंबईत धुरकट हवेसह सूर्यप्रकाश कमी असल्याचे दृश्य होते तर मुंबईतले रस्ते, वाहने, झाडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात धूळ जमा झाली होती. सोमवारी मुंबईत धुळीचा प्रभाव कमी होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. 
 
गुजरातवर निर्माण झालेले धुळीचे वादळ आणि मुंबईमध्ये वाहणारे पश्चिमी वारे यांच्या संयुक्त प्रभावामुळे मुंबईमध्ये धुळीचे वारे वाहत असल्याची माहिती वरिष्ठ हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
 
धुळीच्या वादळामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक रविवारी अतिवाईट नोंदवला गेला. मुंबईचा गुणवत्ता निर्देशांक ३३३ होता. मुंबईत माझगाव, वरळी, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, भांडुप येथे हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदवली गेली. मालाड येथे हवेचा दर्जा धोकादायक नोंदला गेला. मालाड येथे पीएम २.५चा गुणवत्ता निर्देशांक ४३६ होता. कुलाबा येथे दिवसभर हवेची गुणवत्ता वाईट, तर बोरिवली येथे मध्यम होती.
 
वातावरणात अचानक झालेल्या या बदलांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. या धुळीमुळे मानवी जीवनावर काय परिणाम होतात, नागरिकांना काय काळजी घ्यावी लागेल याच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनानं द्याव्या, अशी मागणी नागरीक करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती