बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा व मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा दोन शाळा एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हर्नमेंट स्कूल्स इन इंडिया – सन 2021-2022(Education World School Ranking of Govt. Schools in India) या उपक्रम अंतर्गत ऑगस्ट 2021 मध्ये आयोजित सर्वेक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यासाठी या शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत, भौतिक सुविधा, अध्यापन कृती, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, सह-शालेय उपक्रम, ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, मुख्याध्यापक नेतृत्व गुण, पालकांचा सहभाग या सर्व मुद्यांचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता.
सर्वेक्षणामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विविध शाळांची सखोल परिक्षण अंती निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस मनपा शाळेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर पाचव्या क्रमांकाने मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळेस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर दहावे मानांकन प्राप्त झाले आहे.