दसरा मेळाव्याबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आणि थेट भाष्य केले
गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (08:51 IST)
मुंबई राज्यातील राजकीय वातावरण तापविणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आणि थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आमच्या सर्वच कार्यकर्ते आणि नेत्यांचा दसरा मेळावा व्हावा असा आग्रह आहे, त्यामुळे दसरा मेळावा होणारच असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमने सामने येण्याची चिन्हे आहेत. येथील शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु आहे.
शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिका प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाचा अवलंब करण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम अर्ज उद्धव यांच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे जर उद्धव यांना परवानगी देण्यात आली तर वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा घेण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. आम्ही शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन ठिकाणी परवानगीसाठी अर्ज केला आहे, असे शिंदे गटाचे मुख्य प्रतोद शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी सांगितले आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून आता राजकीय महाभारत रंगताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेनेने काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यास अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यापाठोपाठ शिवसेनेचा बंडखोर गट म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज उपस्थित राहावे याकरिता शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे.
दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला शिंदे गटाचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित असल्याचे गोगावले यांनी सांगितले. “आम्ही सर्व बाबींवर अंतिम निर्णय घेऊ आणि जनतेला दाखवून देऊ की बाळासाहेबांचे शिवसैनिक त्यांचा दसरा मेळावा कसा आयोजित करतात.” असंही गोगावले म्हणाले. शिंदे-ठाकरे हे या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने आता हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आम्ही आमदार पुढे नेत आहोत. १५ वर्षे मी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज करत असतो. यावर्षीही आमचीच शिवसेना खरी असल्याने दसरा मेळाव्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी, असा अर्ज केल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली, तर शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्हीच आधी अर्ज सादर केला. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनीच परंपरा पुढे चालू ठेवली आहे. त्याला कृपया छेद देऊ नका. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असे त्यांनी ठणकावले आहे.
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, हा दसरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. यामुळे शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा झाली असून शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार असे देखील एकनाथ शिंदेंनी या बैठकीत म्हटले आहे. राज्यात संघटनात्मक बांधणी करा. आगामी पालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरा. दसरा मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करा असे आदेश शिंदेंनी दिले. मात्र, यासह कायदा आणि सुव्यवस्थेचं भान ठेऊन वागा अशी तंबी देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. या बैठकीत शिंदे गटातील आमदार, खासदारांना जिल्हा पातळीवर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आले. तसेच हिंदू गर्व गर्जना यात्रा ताकदीने यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाची जय्यत तयारी करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे जे काय होईल ते नियमानुसार होईल असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळावा नेमका कुठे होणार? या प्रश्नावर उत्तर दिले आहे.