राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जोरदार चर्चा आहे. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच शिवतीर्थ निवासस्थानी जात राज यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे-भाजपा एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. तर मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या जवळीक पाहता शिवसेनेने राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत म्हणाले की, राज ठाकरेंचे आतापर्यंत किती प्रयोग झाले? रोज सरड्यासारखा रंग बदलणारे आणि इव्हेंट मॅनेजमेंट करणारी ही माणसे आहेत. आज मोदींसारखा कारभार नाही, उद्या मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, शरद पवारांसारखे नेतृत्व नाही. त्यानंतर शरद पवार भ्रष्टाचारी, रोज विचार बदलतात. त्यामुळे ती आंधी नाही वैगेरे नाही. जनता आंधी निर्माण करू शकते पक्ष नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच देशात संविधानावर घाला घातला जात आहे हे जनतेला कळतंय. देशाच्या घटनेवर घाव घालणारं काम देशात होतंय. भोंग्याबद्दल कुणी दखल घेऊ नये. किरीट सोमय्यांनी जेवढ्यांवर आरोप केले ते आज भाजपात आहे. मग ईडी गप्प का? तपास यंत्रणा गप्प का? नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्यावरील ईडी कारवाईचं काय झालं? असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी विचारला.