भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतरांवर न्यायालयाच्या आदेशाने खंडणी व फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडत तो न देता तसेच पैसे भरण्यास धमकावून फसवणूक केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा (रा. अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई) तसेच ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांच्याद्वारे सुरेंद्रन नायर यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात IPC कलम 384, 385, 406, 420, 120 (ब), 34 सह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 54 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सर्व प्रकार 2013 ते मार्च 2021 या कालावधीत घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वकिल आहेत. त्या पुण्यातील गोखले रोड परिसरात राहतात. त्यांना मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता. त्यानुसार त्यांनी मित्रांमध्ये चौकशी सुरू केली. यावेळी त्यांना त्यांच्या मित्रांच्या सर्कलमधून मंगलप्रभात लोढा यांच्या स्कीममध्ये फ्लॅट बुक करण्याचे सुचवण्यात आले.. त्यानुसार त्यांनी माहिती घेतली. यावेळी मंगलप्रभात हे ज्वाला रियल इस्टेट (नंतर नाव, मायक्रोटेक डेव्हलपर्स झाले) चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर होते. तर सध्या मंगलप्रभात यांचा मुलगा अभिषेक लोढा हे त्या कंपनीचे चेअरमन आहेत.