बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला राष्ट्रवादीत जाणार, अजित पवार म्हणाले- आणखी धक्का बसणार

शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (18:12 IST)
काँग्रेसचे माजी नेते बाबा झियाउद्दीन सिद्दीकी शनिवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी काँग्रेसचा निरोप घेतला. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.
 
पुण्यात पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत." 11 फेब्रुवारीला आणखी काही लोक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. मात्र त्यांनी याबाबत फारशी माहिती दिली नाही.
 
मुंबईत काँग्रेसला दुहेरी झटका!
माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच मुंबईतील आणखी एक मोठे नेते सिद्दीकी यांनी काँग्रेसला अलविदा केल्याची माहिती आहे. वांद्रे येथे 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
कोण आहेत बाबा सिद्दीकी?
सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 1999 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. यानंतर 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. 2004 ते 2008 या काळात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषवले. आमदार होण्यापूर्वी ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. बाबा सिद्दीकी हे 1992 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेचे (BMC) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1997 च्या बीएमसी निवडणुकीतही त्यांना यश मिळाले.
 

09-02 2024 ️ पुणे

पत्रकारांशी संवाद
https://t.co/4KTFzBXUvp

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 9, 2024
राष्ट्रवादीला कसा फायदा होईल?
सिद्दीकी हे मुंबईतील काँग्रेसचा प्रमुख अल्पसंख्याक चेहरा होते. वांद्रे, मुंबई आणि आजूबाजूला अल्पसंख्याक समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात, ज्यांमध्ये सिद्दीकी यांचा खोलवर प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी सध्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून काँग्रेसचा आमदार आहे. 66 वर्षीय सिद्दिकी म्हणाले की, जीशान स्वतःची राजकीय वाटचाल ठरवतील. सिद्दीकी म्हणाले की, आपण शनिवारी रॅली काढणार असून त्यात महाराष्ट्रभरातील नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य सहभागी होणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती