मुंबईत एका व्यक्तीने आपली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, जेव्हा या प्रकरणाचा तपास पुढे सरकत होता तेव्हा मात्र जे समोर आले ते पाहून पोलिसांना धाकच बसला. गेल्या पाच वर्षांपासून वडील आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते आणि त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी ती घर सोडून गेली होती, असे पोलिसांना आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुरुवारी आरोपीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला, असे एका अधिकारींनी सांगितले आहे. वडिलांच्या क्रूरतेला कंटाळून मुलीने बुधवारी मध्य मुंबईतील महालक्ष्मी परिसरात आपले घर सोडले अशी माहिती समोर आली आहे.
आपल्या मुलीचा पत्ता न लागल्याने आरोपी वडिलांनी ताडदेव पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शोध सुरू असताना पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकात पीडित मुलगी सापडली. मुलीला गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले, तेथे चौकशीदरम्यान तिने उघड केले की तिच्या वडिलांनी तिचे वारंवार लैंगिक शोषण केले होते, असे अधिकारींनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की, तिचे वडील गेल्या पाच वर्षांपासून त्याचे लैंगिक शोषण करत होते. तिच्या तक्रारीवरून संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपी वडिलांना ताडदेव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.