महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आंदोलक अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर दगडफेक केली. यामुळे अनेक पोलीस जखमी झाले असून दगडफेकीत पोलिसांच्या अनेक वाहनांचे आणि दुचाकींचे नुकसान झाले आहे. जमावाला थांबवण्याकरिता पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याशिवाय पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपीचे महंत यती नरसिंहानंद महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरूंविरोधात दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये तणाव वाढला आहे. तसेच शनिवारी अल्पसंख्याक समाजातील लोकांनी नागपुरी गेट पोलिस स्टेशनला घेराव घालून कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने केली. काही हल्लेखोरांनी पोलिस स्टेशन आणि तेथे उपस्थित पोलिसांवर दगडफेक केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले आहे. तसेच जमावाने पोलिसांच्या चार ते पाच मोठ्या वाहनांची आणि 10 ते 15 मोटारसायकलींची तोडफोड करून नुकसान केले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांचा शोध सुरू केला आहे. सर्व प्रमुख पोलीस अधिकारी आणि अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे पथकही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असून लवकरच वातावरण बिघडवणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.