मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने भरलेली कार

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (08:07 IST)
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील अँटीलिया Antilia या बंगल्यासमोर संशयास्पद कार आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.एक राखाडी रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या तब्बल 20 कांड्या सापडल्या आहेत. तसंच एक धमकीचं पत्रही या गाडीमधून मिळाल्याची माहिती मिळतेय. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, स्फोटकांनी भरलेल्या या स्कॉर्पिओ गाडीबाबत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही गाडी बुधवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे.
 
पोलीस पथकासह घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच फॉरेन्सिकचे पथक, एसएसजीची सिक्युरिटी दाखल झाली असून हा घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धमकीच्या पत्रात अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबाबत मजकूर आहे.
 
अंबानी यांचं घर दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर आहे. या परिसरात बुधवारी मध्यरात्री राखाडी रंगाची एक स्कॉर्पिओ दाखल झाली. नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या ठिकाणीच ही गाडी उभी होती. महत्वाची बाब म्हणजे या स्कॉर्पिओ गाडीसोबत त्या ठिकाणी अजून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीही होती. इनोव्हा गाडी ही बरोबर स्कॉर्पिओच्या मागेच होती. अंबानी यांच्या घराजवळ या दोन्ही गाड्या दाखल झाल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीची लाईट बंद करण्यात आली. त्यानंतर मागे थांबलेली इनोव्हा गाडी स्कॉर्पिओ गाडीच्या काहीशी पुढे निघून गेली.
 
काही वेळ गेला तरी स्कॉर्पिओ गाडीतून कुणीही खाली उतरलं नाही. 30 सेकंदाच्या फरकाने त्या ठिकाणावरुन एक टॅक्सीही पास झाल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीतील व्यक्ती उतरते आणि पुढे उभी असलेल्या इनोव्हा गाडीत बसते आणि तिथून ती इनोव्हा गाडी निघून जाते, अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.
 
जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटकं म्हणून केला जातो. विशेषत: खाणकाम, विहिरी खणणं, मोठमोठे दगड फोडणे किंवा दगड खाणींमध्ये जिलेटीनचा वापर केला जातो. लांबून वात पेटवून स्फोट घडवून, या दगड फोडण्यासाठी विशेषत: जिलेटीनचा वापर केला जातो. मात्र जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या यापूर्वी अनेकवेळा आल्या आहेत. एका जिलेटीनच्या कांडीत भीषण स्फोटाची क्षमता असते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ तर 20 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. त्यामुळे या कांड्यांची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती