काल मुंबईत झालेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) मध्ये सात आघाडीच्या कंपन्यांनी - जिओस्टार, गुगल, अॅडोब, मेटा, अॅपल, एनव्हीडिया आणि मायक्रोसॉफ्ट - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसोबत करार केला.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव , केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या आशय पत्रांची देवाणघेवाण झाली. मंत्री वैष्णव म्हणाले की, ही संस्था अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (AVGC-XR) क्षेत्रासाठी राष्ट्रीय केंद्र बनण्यास सज्ज आहे.
वैष्णव म्हणाले की, भारतामध्ये मीडिया आणि मनोरंजनाच्या जगात जागतिक नेतृत्वाची भूमिका बजावण्याची क्षमता आहे. ही संस्था त्या दिशेने पहिले पाऊल आहे आणि आपल्याला त्यावर काम करायचे आहे. जागतिक कंपन्या आयआयसीटीसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे मंत्री म्हणाले.