40 बांगलादेशींना भिवंडीतून अटक, आरोपींकडून बनावट कागदपत्रे जप्त

बुधवार, 1 डिसेंबर 2021 (10:52 IST)
मुंबईला लागून असलेल्या भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 40 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत अटक केली आहे. बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही देशात बेकायदेशीरपणे राहणारे अनेक बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या कारवाईत अडकले आहेत. या आरोपींकडून बनावट भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि लाखो रुपयांचे मोबाईल फोनसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. 
 
गुप्त माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या अनेक पोलिस ठाण्यांच्या वेगवेगळ्या पथके तयार करून ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्वजण भिवंडीतील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये काम करायचे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी बांगलादेशातील त्यांच्या नातेवाईकांशी इमो अॅपद्वारे बोलायचे आणि बनावट कागदपत्रे बनवून येथे लपून बसले होते. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून 94,900 रुपये, 28 मोबाईल फोन, भारतीय पासपोर्ट आणि इतर भारतीय कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे.
 
त्यांना बेकायदेशीरपणे भारतात आणणाऱ्या एजंटचा आणि बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पोलिस आता शोध घेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती