बांधकामांना बाधक ठरणाऱ्या ३५५ झाडांची कत्तल होणार

गुरूवार, 13 जानेवारी 2022 (21:43 IST)
मुंबईत मेट्रो रेल्वे, पूल, नाला व इमारत बांधकामांना बाधक ठरणाऱ्या ३५५ झाडांची कत्तल करण्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होऊ घातलेल्या मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. यामध्ये, वांद्रे येथे मेट्रो रेल्वे कामाच्या अंतर्गत ४४ झाडे कापण्यात येणार आहेत तर ४२ झाडे पुनररोपित करण्यात येणार आहेत. तसेच, दहिसर येथे मेट्रो रेल्वे कामाच्या अंतर्गत ७५ झाडे कापण्यात येणार असून १०८ झाडे पुनरारोपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या कामाच्या अंतर्गत ११९ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. तर एकूण १५० झाडे मूळ जागेवरून हटवून ती दुसऱ्या ठिकाणी पुनरारोपित करण्यात येणार आहेत.
 
तसेच, मलबार हिल आणि अंधेरी या ठिकाणी पुलांच्या बांधकामासाठी ४८ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे तर ६७ झाडे हटवून पुनरारोपित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, देवनार येथे बंगल्याच्या कामासाठी ६ झाडांची, सांताक्रूझ येथे रेल्वेच्या ६ व्या लाईनच्या कामासाठी ३३ झाडांची तर वडाळा ट्रक टर्मिनल्स येथे नाल्याच्या बांधकामासाठी ४२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजुरीला सादर करण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती