मुंबईत 2026 पर्यंत 337 किमीचं मेट्रोचं जाळं उभारणार-मुख्यमंत्री

रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (10:48 IST)
"एमएमआरडीए'च्या माध्यमातून 337 कि. मी. चे मेट्रोचे जाळे विणले जात असून हा संपूर्ण प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होईल. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल. मेट्रोमुळे रस्त्यावरील 40 लाख वाहने कमी होतील," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि 'कन्स्ट्रक्शन टाईम्स'च्या सहकार्याने शनिवारी मुंबईच्या फोर सिझन हॉटेलमध्ये 'मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन अ‍ॅक्ट 2034' या विशेष एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
 
आजही मुंबईतील 60 टक्के जनता झोपडपट्टीत राहते. 2052 मध्ये हे प्रमाण आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि त्याबरोबरीने मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टीमुक्त करणे हे या सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी झोपु योजनांना गती देण्यात येईल,
 
सध्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. लवकरच त्याच्या एका टप्प्याचे उद्घाटन होईल. समृद्धीचा विस्तारही करण्यात येत आहे. मुंबई - सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्गही बांधण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील दळणवळण सेवाही मजबूत होईल
 
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 
त्यानुसार मुंबईतील एक हजार कि.मी.च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी 450 कि.मी.च्या रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.
 
Published By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती