जीएसटी विभागाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या करदाता मे पाकीजा स्टिल एलएलपी चे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय ९९.२७ कोटी रुपयांची बनावट बीजके प्राप्त करुन १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविण्यात आली. ही एक प्रकारे सरकारची कोट्यवधींची फसवणूक आहे. याप्रकरणी सय्यद तैकीर हसन रिजवी या व्यक्तीस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी अटक केली आहे.
सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी मे. पाकीजा स्टिल एलएलपी आणि मे मायल स्टिल प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ९९.२७ कोटी रुपयांची खोटी खरेदीची बिजके प्राप्त केली आहेत. त्यातून या व्यक्तीने शासनाची सुमारे १७.८७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे. या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात अन्वेषण अधिकारी डॉ. विद्याधर जगताप, सहाय्यक राज्यकर आयुक्त हे मोहन चिखले, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या तपासासाठी अनिल भंडारी (भा.प्र.से), सहआयुक्त, अन्वेषण-क यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यवाहीसाठी प्रशांत खराडे आणि श्रीकांत पवार या सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि इतर राज्यकर निरीक्षक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. या अटकेसह आर्थिक वर्षातील सलग २८ अटक कारवाया महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने केल्या आहेत.