संयुक्‍त तपासणी समितीचा पाकिस्‍तानचा प्रस्‍ताव

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (16:21 IST)
PR
दहशतवाद ही केवळ भारताचीच नव्‍हे तर पाकिस्‍तानचीही डोकेदुखी आहे. दोन्‍ही देशांनी या अडचणीचा एक‍त्र येऊन सामना करण्‍याची गरज आहे. हल्‍ल्‍याचा तपास करण्‍यासाठी भारत आणि पाकिस्‍तानच्‍या अधिका-यांची संयुक्‍त तपासणी समिती बनविण्‍यासही आम्‍ही तयार आहोत, असा प्रस्‍ताव पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्री हमीद कुरैशी यांनी दिला आहे.

भारताने काल आपल्‍याला हव्‍या असलेल्‍या मोस्‍ट वॉन्‍टेड 20 लोकांची यादी पाकिस्‍तानला दिली असून त्‍यासंदर्भात आठ दिवसांत खुलासा करण्‍याची मागणी केली आहे. तर अमेरिकेसह अनेक देशांनी पाकिस्‍तानवर शरसंधान साधून तपासात भारताला सहकार्य करण्‍याचा दबाव आणण्‍याने पाकिस्‍तानने आता मवाळ भूमिका घेत भारतासमोर संयुक्‍त तपासणी समितीची स्‍थापना करण्‍याचा प्रस्‍ताव ठेवला आहे.

कुरैशी म्‍हणाले, की पाकिस्‍तानला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. भारताशी सुरू असलेली शांती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्‍याची आमची इच्‍छा आहे. सध्‍याच्‍या अस्थिरतेच्‍या परिस्थितीत एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करण्‍याची ही वेळ नाही. त्‍यामुळे दोन्‍ही देशांनी एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला करण्‍याची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा