मुंबईवरील हल्ला म्हणे भारताचेच कारस्थान

मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगत असला तरी दुसरीकडे मात्र भारताविरोधात विष ओकणं सुरू आहे. 'यू ट्युब'वर त्याचा एक व्हिडीओ पहायला मिळतो. यात पाकिस्तानचा एक लष्करी तज्ज्ञ भारताविरोधात जहरी भाषा वापरून भारत 'तहरिके तालिबान' या अतिरेकी संघटनेचा समर्थक आहे, असेही तो म्हणतो.

पाकिस्तानी टिव्ही चॅनेल 'न्यूज-१' वर 'मुझे इख्तलाफ है' नावाचा एक कार्यक्रम प्रसारीत करण्यात आला. त्यात जैद हामिद नावाच्या एका कथित लष्करी तज्ज्ञाने भारताविरोधात नाही नाही ती वक्तव्ये केली आहेत. जैदच्या मते मुंबईवरील हल्ला हे भारताचेच कारस्थान आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी त्याचा कट रचला आहे.

जैद खोटारडा आहे, यात काहीही शंका नाही. त्याने केलीली वक्तव्ये मात्र भयंकर आहेत. त्याच्या मते, भारतात गेल्या चार महिन्यांपासून अल्पसंख्याकांविरूद्ध मोहिम चालवली जात आहे. दोन हजारांहून अधिक ख्रिश्चनांना येथे मारण्यात आले आहे. कितीक चर्च जाळण्यात आले.

हमिदच्या मते मुंबईतील हल्ला हिंदू संघटनांनी केलेले 'उद्योग' लपविण्यासाठी घडविण्यात आला आहे. त्याचा इशारा मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व हिंदू संघटनांकडे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, बजरंग दल, शिवसेनाव व अन्य फुटीरतावादी हिंदू संघटनांनी भारतीय लष्करी अधिकार्‍यांची हातमिळवणी करून हे कृत्य केले आहे.

मुंबई हल्ल्याचे खापर हिंदू संघटनांवर फोडताना हमिद म्हणतो, जगाचे लक्ष्य मालेगाव स्फोटावरून विचलित व्हावे यासाठी त्यांनीच हे कृत्य घडवले आहे. मालेगाव स्फोटातील लष्करी अधिकारी पुरोहितला भाजपने लोकसभेचे तिकीटही जाहिर केले आहे.

मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पाकिस्तानातील फरिदकोटच्या अजमल अमीर कसाबला जैद यांनी हिंदू दहशतवादी असे संबोधले आहे. त्याच्या हातात बांधलेला लाल धागा तो हिंदू असल्याचे निदर्शक आहे. कारण मुसलमान असा कोणताही धागा हातात बांधत नाही, याकडेही जैदने लक्ष वेधले आहे.

एटिएस प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे व इन्सपेक्टर विजय साळसकर यांच्या मृत्यूनंतर हिंदूत्ववादी संघटनांनी आनंद व्यक्त केलायाच जावईशोधही जैदने लावला आहे.

भारतीय संसदेवर झालेला हल्ला हेही नाटकच होते, असे जैदचे म्हणणे आहे. अमेरिकेने 9/11 चा हल्ला दाखवून अफगाणिस्तानवर हल्ला चढवला, भारतही तसेच नाटक करून पाकिस्तानवर हल्ल्याची संधी साधत असल्याचा त्याचा आरोप आहे. असे अनेक तारे या हमिद जैदने तोडले आहेत.

वेबदुनिया वर वाचा