कसा होता "पेशवाई थाट"?
पेशवाईतील भोजन व्यवस्थेचा थाटमाट ...
पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत. नित्य, नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात.
पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत. त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, केळीच्या पानावर वाढल्या जात. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप, ताक, दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत. दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत.
सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरु केली. पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरडया व खीर पुरण असे. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या, आमट्या, सार, सांबार, व पक्वान्ने, पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या व भाताचे प्रकार. ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात बरीच वर्षे टिकून आहे.
ब्राम्हण भोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान, दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण, पानाभोवती रांगोळ्या, बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी (एक पक्वान् खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी), पानात १० भाज्या त्यात तोंडली, परवरे (पडवळ), वांगी या भाज्या नित्य असत. तुरीचे वरण, २ प्रकारची सांबारे, आमटी, १० प्रकारची लोणची (त्यातील एक साखरेचे गोड) असे. ३-४ प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढीवडे, साजूक तूप, माध्यम गोड मठ्ठा, २ प्रकारच्या खिरी (शेवयाची व गवल्याची), सपिठाच्या पूर्ण पोळ्या (पुरण पोळ्या), खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे, चिकवड्या, मिरगोंडे (मिरगुंडे), फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, २० प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या, पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी, चाकवताचे सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा, मेथी किंवा आंबाडीची भाजी, चटण्या, कोशिंबिरीत कोथिंबीर लसण, आले, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारले, आमसुले, हरभऱ्याची डाळ, लिंबे याचा वापर करीत. तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घीवर, आमरस, श्रीखंड ( हे पक्वान्न शे बाजीराव ( दुसरे ) यांनी प्रचारात आणले. बासुंदी, केशरी साखरभात, जिलेबी ( हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले.) लाडू, पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते.) भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी विडा दिला जाई. ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती.)