निरागस बदल

पल्लवी डोंगरे

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (14:48 IST)
अरविंद आणि पर्णा ह्यांना एक मुलगी असते व तिचे नाव आर्या. अरविंद म्हणजे एक व्यवसायीक आणि शिस्तप्रिय व्यक्ती. ह्या दोघांनाही इतर पालकांसारखं आपली मुलगी खूप यशस्वी व्हावी व स्वतःचे नाव काढावे अशीच अपेक्षा असते. त्यासाठी पर्णा सुद्धा वेळोवेळी आपल्या मुलीला संस्काराचे धडे देत असते. गरजेला हात मोकळे करीत पैसा खर्च करावा पण उधळ माप होऊ द्यायची नाही असे दोघे ही आर्याला शिकवत असत.
 
आर्या त्यांच्या शहरातल्या नावाजलेल्या शाळेत शिकत असते. आर्याचा वाढदिवस आला आणि तिने तिच्या दहाव्या वाढदिवसाला मैत्रिणींना घरी बोलवण्याचा गोड हट्ट धरला. पर्णाच्या मनगटांना काही त्रास असल्याने अरविंदने घरी काही ही न करण्याचे ठरवले. आर्या स्वतःही खूप समजदार असल्याने कुणालाही तिला दुखवावे असे नाही वाटले. मैत्रिणींना आपल्या वाढदिवसाला बोलवले की त्या खूप छान वागतात असा आर्याचा गैरसमज होता पण पर्णा तिला समजवत होती की वाढदिवसाला मैत्रिणींना बोलवणे ही आवड असू शकते पण ह्यानी मैत्री घट्ट होते ही समजूत चुकीची आहे. 
 
शेवटी अरविंदने ठरवले की आता काही का असे ना, आपण वाढदिवस बाहेर "हॉल बुक" करून साजरा करु. जवळचे नातेवाईक व वर्गातल्या मैत्रिणींबरोबर आर्याने वाढदिवस साजरा केला. त्यादिवशी आर्या खूप खुश होती. तिची शाळा यथोवत सुरू होती पण तिला शाळेत मैत्रिणींमध्ये फारसा फरक जाणवला नाही. मुली तशाच वागत होत्या जशा त्याआधी वागायच्या. हे पाहून आर्याला खूप वाईट वाटले. काही दिवसाने तिच्या शाळेने तिच्या संपूर्ण वर्गाला अनाथाश्रमात नेण्याचे ठरवले व विद्यार्थ्यांना सांगितले की तिथे जी लहान मुले आहेत, त्यांच्यासाठी कोणाला ही स्वेच्छेने खेळणी किंवा दररोज लागणारी गरजेची वस्तू द्यायची असल्यास आणावी व स्वतः त्या मुलांना द्यावी. अनिवार्य नाही पण द्यावयाची इच्छा असल्यास वस्तू आणून द्यावी. 
 
आर्याने ही गोष्ट घरात सांगितली. तिला अरविंद आणि पर्णाने तिथल्या लहान मुलांसाठी काही गोष्टी विकत आणून दिल्या. आर्या आनंदाने शाळेत गेली व वर्गासोबत त्या अनाथाश्रमात पोहोचली. तिथे खूप लहान मुले पाहिली. ती तिच्या जवळच्या वस्तू त्या मुलांना देऊ लागली पण कुठे तरी तिच्या बालमनाला या गोष्टींचा त्रास होत होता की ह्या मुलांकडे यांचे आई-बाबा, आजी-आजोबा हे कोणीही नाही तरी ह्यांना हसता येत होतं. ते तिथेही आनंदी होते.
 
आता मात्र आर्याच्या मनात काही नवीन विचार होते. ती घरी आल्यावर आईला बिलगून रडत होती. हळव्या स्वरात ती पर्णाला म्हणाली... आई.. माझ्या कडे सर्व आहे. घर, आई - बाबा, काका, आजी- आजोबा.. पण त्या मुलांना कोणीही नाही. ह्या पुढे मी माझा वाढदिवस त्या मुलांसाठी भेटवस्तू आणून व त्यांना देऊन साजरा करीन.
 
अरविंद आणि पर्णाचे डोळे आर्यात आलेल्या या बदलाने आनंदाने भरून आले होते.
 
- पल्लवी डोंगरे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती