Deep Amavasya दीप अमावस्या पौराणिक कहाणी

गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (10:48 IST)
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या.
 
पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली.
 
नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली.
एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली.
 
अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली.
 
नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले.
 
मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावास्येसाठी सांगितली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती