मराठी कथा : ओझे

गुरूवार, 13 ऑक्टोबर 2016 (11:51 IST)
एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी 12 वाजले होते. रणरणत्या उन्हाने बेजार केले होते. एक साधू या मार्गावरून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्याच्या जवळ दोन शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढंच सामान होतं. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं सामान ओझं वाटत होतं, आणि घामाच्या धारा त्याच्या अंगावरून वाहात होत्या. थोडं पुढं गेल्यावर त्याला एक 70 वर्षाची आदिवासी महिला 8 वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उपचारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठय़ा उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
 
साधूने त्या महिलेला विचारलं, ‘आजी, इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही हा उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढय़ाशा ओझ्यानं हैराण झालो आहे.’ त्या वृद्धेनं साधूला नीट निरखून पाहिलं आणि म्हणाली, ‘महाराज, ओझं आपण वाहात आहात, हा तर माझा नातू आहे!’
 
तात्पर्य : खर्‍या प्रेमाने केलेल्या गोष्टीचे ओझे वाटत नाही.

वेबदुनिया वर वाचा