भारतीय शेअर बाजारात तेजीची लाट कायम आहे. जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान आज सोमवारी (दि.८) सेन्सेक्सने ३५० हून अधिक अंकांनी वाढ नोंदवत ७४,६५८ च्या सर्वकालीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टीने २२,६२३ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला. आयटी आणि ऑटो शेअर्समधील खरेदीमुळे शेअर बाजाराने मजबूत सुरुवात केली आहे.
दरम्यान, शेअर बाजारातील आजच्या सर्वकालीन उच्चांकामुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने प्रथमच ४०० लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे बीएसई बाजार भांडवलात केवळ ९ महिन्यांत १०० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज ४०० लाख कोटी पार झाले. मार्च २०१४ मध्ये बाजार भांडवल १०० लाख कोटी रुपये होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये ते २०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जुलै २०२३ मध्ये ते ३०० लाख कोटींवर गेले आणि आता केवळ नऊ महिन्यांनंतर बाजार भांडवलाने ४०० लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.