शेअर बाजाराचा नवा उच्चांक

शुक्रवार, 7 मार्च 2014 (10:57 IST)
चालू खात्यावरील तूट (कॅड) कमी झाल्याने आणि सकारात्मक घटनांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दाखविला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गुरुवारी नोंदविला.
 
डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ‘कॅड’ घसरून ‘जीडीपी’च्या तुलनेत 4.2 अब्ज डॉलरवर गेली. त्यामुळे बाजारातील व्यवहार सुरू होतानाच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता. सत्रांतर्गत व्यवहारात सेन्सेक्स 21,525 अंशांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. अखेरीस 237.01 अंशांची वाढ नोंदवून 21,513.87 अंशांच्या उच्चांकावर बंद झाला. या पूर्वीची सेन्सेक्सची उच्चांकी पातळी 21,372.66 अंश होती. तीन सत्रांत सेन्सेक्स 567 अंशांनी वधारला. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी या शेअरमुळे बाजारात वाढ होण्यास मदत झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 72.50 अंशांनी वधारून 6,401.15 अंशांच्या उच्चंकी पातळीवर बंद झाला. 
 
‘परकीय गुंतवणुकीचा ओघ चांगला असल्याने आणि रिटेल गुंतवणूक वाढल्याने बाजारात वाढ होण्यास मदत झाली. निवडणुकीपूर्वी बाजारात तेजी दिसते, असा अनुभव आहे आणि ती दिसत आहे. निवडणुकीत चांगला निकाल लागेल, अशी अपेक्षा असल्याने आगामी  काळात बाजारात वाढ होऊ शकते, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक मोतीलाल ओसवाल यांनी व्यक्त केला. युरोपीय बाजारात असलेल्या सकारात्मक प्रवाहाचा प्रभाव बाजारातील वातावरणावर पडला.

वेबदुनिया वर वाचा