कपडे किंवा फुटवेअर ऑनलाइन खरेदी करताना

मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (11:35 IST)
आजच्या आधुनिक युगामध्ये आपल्या गरजेची कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. अगदी रोजच्या गरजेच्या वस्तूंपासून ते आपल्याला आवश्यक असणार्‍या आधुनिक यंत्रापर्यंत सर्व काही ऑनलाइन उपलब्ध आहे. शिवाय वस्तू खरेदी करताना आपल्याला निरनिराळ्या ब्रँडस्‌ व त्याच्या किमतींची पडताळणी देखील घरबसल्या करता येऊ शकते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे 'चार दुकाने हिंडून मग जिथे पटेल तिथे खरेदी' ही पद्धत आता लुप्त होत चालली आहे. त्याशिवाय वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक वेबसाईटस्‌चे पर्यायही आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करण्यास लोक जास्त पसंती न देतील तरच नवल. 
 
मात्र अनकेदा कपडे किंवा शूज ह्यांची ऑनलाइन खरेदी केल्यानंतर जेव्हा ह्या वस्तू प्रत्यक्षात आपल्या हातामध्ये पडतात तेव्हा आपण आपल्याकडून योग्य साइझ निवडला असला तरी देखील ह्या वस्तूंचे  फिटिंग व्यवस्थित नसते. त्या वस्तूच्या सोबत त्याचे साइझ चार्टस्‌ दिले गेले असले, एकच साइझचार्ट प्रत्येक ब्रँडसाठी एकसारखाच असेल असे नाही. प्रत्येक ब्रँडचे साइझ चार्ट निराळे असतात आणि त्यामुळे वस्तूचा साइझही ब्रँडप्रमाणे बदलत राहतो. म्हणून अनेक वेळी ऑनलाइन कपडे किंवा शूज खरेदी करताना साइझ किंवा वस्तूचे फिटिंग योग्य नसण्याची शक्यता उद्भवते. अशा वेळी व्यवस्थित फिटिंग न होणारे कपडे किंवा शूज हाती पडले तर पुन्हा ते परत करून नवीन वस्तू ऑर्डर करण्याची उठाठेव करीत बसावे लागते. त्यामुळे अशा वस्तूंची ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक ठरते.
 
फुटवेअर किंवा कपड्यांची खरेदी करताना त्या ब्रँडचा साइझचार्ट नीट पाहून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता शूज खरेदी करताना आपल्या पावलांची व कपडे खरेदी करताना उंची, रुंदी आणि इतर आवश्यक मापे घेऊन मग सर्व मापे साइझ चार्टमध्ये दिलेल्या साइझेसशी जुळवून पाहावीत आणि त्यानंतरच योग्य साइझ मागवावा. ऑनलाइन खरेदी करताना पाच निरनिराळी मापे, साइझ निवडताना पाहावयास मिळतात. हे साइझ, सेंटीमीटर, यू के नंबर, यू एस नंबर, ई यू नंबर आणि इंचांमध्ये दिलेले असतात. त्यामुळे आपल्या मापांच्या नुसार योग्य तो साइझ निवडावा. शूजची खरेदी करताना पावलाचे माप अचूक असणे अगत्याचे ठरते. क्वचित एखाद्या व्यक्तीचे एक पाऊल दुसर्‍या पावलाच्या मानाने किंचित मोठे असण्याची शक्यता असते. असे असल्यास मोठ्या पावलाच्या मापानुसार शूजचा साइझ ठरवावा. त्याचप्रमाणे मोजे घातल्यानंतर शूज घट्ट होणार नाहीत अशा बेताने आपल्याला योग्य असा साइझ मागवावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती