हायब्रिड वर्किंग: काही दिवस ऑफिसमध्ये, तर काही दिवस घरून काम करताना काय अडचणी येतात?
रविवार, 31 डिसेंबर 2023 (17:19 IST)
कोरोना काळात जेव्हा संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं, तेव्हा जगभरातील कार्यालयांमध्ये रिमोट किंवा वर्क फ्रॉम होम व्यवस्था लागू केली गेली.
ऑफिसमध्ये न येता घरून किंवा इतर ठिकाणाून काम करण्याची ही पद्धत नवीन नव्हती, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती पहिल्यांदाच वापरली गेली.
नंतर जेव्हा परिस्थिती सुधारली, तेव्हा अनेक कंपन्यांनी रिमोट वर्किंग संपवून आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावलं.
पण, अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी एकतर 'रिमोट वर्किंग' चालू ठेवलं किंवा 'हायब्रिड वर्किंग' पद्धत सुरु केली.
हायब्रिड वर्किंग म्हणजे काही दिवस ऑफिसला येणं आणि काही दिवस घरून काम करणं.
ऑफिसमध्ये किती दिवस यावं आणि दुसऱ्या ठिकाणाहून किंवा घरुन किती दिवस काम करता येईल यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापले नियम बनवले आहेत.
घरून काम करण्याची सुविधा
नोएडामधील एका टेक कंटेंट कंपनीत काम करणाऱ्या स्वाती सांगतात की, त्यांच्या ऑफिसमध्ये हायब्रिड वर्किंग सुरु आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही ते आवडतं.
त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी आदर्श राठौड यांच्याशी बोलताना म्हटलं की, "कोव्हिडनंतर जेव्हा परिस्थिती सुधारली तेव्हा असं सांगण्यात आलं की ज्यांचं काम घरून करता येऊ शकतं, त्यांना कार्यालयात येणं बंधनकारक नाही. अशा परिस्थितीत मी बहुतेक वेळा माझ्या मूळ गावी ( होम टाऊन) राहून काम करतीये.
जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आम्ही कार्यालयात येतो. पण, हे तेव्हाच घडतं जेव्हा टीमच्या सदस्यांना एकत्र बसून काही काम करायचं आहे. हा हायब्रिड सेटअपचा फायदा आहे."
एकीकडे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा मिळते, तर दुसरीकडे कार्यालयात येऊन एकत्र कामही करता येतं. तसं बघता, काम करण्याची ही पद्धत लवचिक आणि सोयीची वाटते, पण काहीवेळा त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.
लीसमॅनच्या सर्वेक्षण डेटामधून असं समोर आलं की, की तरुण कर्मचारी आणि कार्यालयात नवीन असलेल्यांना अधिकवेळा कार्यालयात यावं लागतं.
बीबीसी वर्कलाइफच्या लेखानुसार, लंडनस्थित लीसमॅनचे संस्थापक आणि सीईओ टीम ओल्डमन म्हणतात की, " कर्मचारी जितका वयान जितका लहान असेल आणि कंपनीतील त्याचा अनुभव जितका कमी असेल तितका त्याला त्याच्या वरिष्ठ आणि जुन्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक दिवस कार्यालयात काम करावं लागत."
अशी काही उदाहरणं भारतात पाहायला मिळतात. दिल्लीतील एका मीडिया संस्थेत काम करणारे अनुज (नाव बदललं आहे) सांगतात की, त्यांच्या कार्यालयात हायब्रिड वर्किंगचा अवलंब करण्यात आला आहे, परंतु टीममधील नवीन, कमी वयाच्या आणि विशेषकरुन अविवाहित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीतील जुन्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक वेळा कार्यालयात यावं लागतं.
ते सांगतात की, "अशी काही कामं आहेत जी घरून करता येत नाहीत. त्यासाठी कार्यालयात यावं लागतं. अशा परिस्थितीत काही टीम सदस्य घरून काम करतात, तर काहींना कार्यालयात यावं लागतं. यातून असंतोष निर्माण होतो."
योग्य प्रकारे अंमलबजावणी न केल्यानं होणारं नुकसान
हायब्रिड वर्किंगचे इतर तोटे देखील आहेत, ज्यात तरुण कर्मचाऱ्यांना अधिक वेळा कार्यालयात बोलावलं जातं आणि वरिष्ठ कर्मचारी मात्र बहुधा घरून काम करतात.
लीसमॅनचे सीईओ ओल्डमॅन म्हणतात की वरिष्ठ कर्मचार्यांना कनिष्ठ कर्मचार्यांपेक्षा अधिक लवचिकता दाखवणं स्वाभाविक वाटत असलं तरी, असं करणं म्हणजे हायब्रिड वर्किंगच्या यशात अडथळा आणणं आहे.
ते सांगतात की, वरिष्ठ सहकाऱ्यांनी घरून जास्त काम केल्यास ऑफिसमध्ये कमी अनुभव असलेल्या सहकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर वरिष्ठ सहकारीही कार्यालयात बरोबरीने आले तर कमी अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना शिकायला मिळू शकतं.
कॅलिफोर्नियातील डिजिटल कम्युनिकेशन टेक कंपनी सिस्कोचे मुख्य उपाध्यक्ष आणि एमडी जितू पटेल यांनी बीबीसी वर्कलाइफचे अॅलेक्स क्रिश्चन यांना सांगितलं की, जोपर्यंत ही समस्या सोडवली जात नाही तोपर्यंत तरुण कर्मचाऱ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येण्याचा धोका असतो.
ते म्हणतात की, हा प्रश्न 'इन पर्सन डेज' शेड्यूल करून सोडवला जाऊ शकतो. म्हणजे असे दिवस, जेव्हा सगळ्यांना ऑफिसला यावं लागतं. मात्र याबाबत काही कठोर नियम केले तर कंपनीचा त्यांच्यावर विश्वास नाही, असं कर्मचाऱ्यांना वाटू शकतं, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणतात की, "प्रत्येकानं कार्यालयात यावं असा नियम करण्याऐवजी एक मॉडेल तयार करावं. या अंतर्गत टीमला कसं काम करायचं आहे, ते स्वतः ठरवण्याची सवलत दिली जाते."
हायब्रिड सेट अपच्या इतरही काही समस्या
डॉ. आशिष शर्मा एका आंतरराष्ट्रीय औद्योगिक संस्थेत सल्लागार आहेत. त्यांना असं वाटतं की, असे काही विषय आहेत ज्यावर मिटिंगमध्ये स्पष्टता येत नाही. कारण त्यात 'व्हर्च्युअल' सहभाग असतो.
बीबीसी प्रतिनिधी आदर्श राठौड यांना आशिष सांगतात की, "वास्तविक व्हर्च्युअल मीटिंग अतिशय सोयीस्कर आणि प्रभावी आहे. कारण तुम्ही त्यात कुठूनही सामील होऊ शकता. पण काही मुद्दे असे आहेत ज्यांवर समोरासमोर बसून चर्चा केली जाऊ शकते."
ते पुढे सांगतात की, " पण हायब्रिड सिस्टीममध्ये असं होतं की, काही सहकारी ऑफिसमध्ये असता, पण बाकीचे सहकारी दुसरीकडे कुठेतरी असतील, तर संपूर्ण मीटिंग व्हर्चुअल होते. त्यामुळे मीटिंग विनाकारण लांबते आणि कधी-कधी निष्कर्षापर्यंत पोहोचणं कठीण होतं."
आशिष असे एकटेच नाहीत, लीसमॅनच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 40 टक्के कर्मचार्यांना हायब्रिड मीटिंगमध्ये भाग घेणं कठीण वाटतं. ते घरून किंवा ऑफिसमधून व्हर्चुअल सहभागी होत असले तरीही.
ओल्डमॅन म्हणतात की, ही समस्या पुढेही दीर्घकाळ राहू शकते. ते सांगतात की, " ही सॉफ्टवेअरची समस्या नाही. अनेक कार्यालयं हायब्रिड मिटिंगसाठी तयार नाहीत. गेल्या पाच वर्षांत आमच्या कामात खूप बदल झाला आहे, परंतु आमची कार्यालयं कोरोना साथीच्या काळानुसार 'डिझाइन्ड' केली गेली आहेत."
कर्मचाऱ्यांना ही सुविधा आवडली असली तरी त्याचा आणखी एक तोटा आहे. लीसमॅनचा डेटा सांगतो की , जे लोक कमी दिवस ऑफिसला गेले होते त्यांनी सांगितलं की त्यांचं वर्क लाइफ बॅलन्स झालं आहे.
पण, 42 टक्के लोकांनी सांगितलं की, जेव्हा ते ऑफिसमध्ये न राहता रिमोट वर्क करत होते, तेव्हा त्यांना असं वाटलं की ते त्यांच्या सहकाऱ्यांशी 'सोशल कनेक्ट' ठेवू शकले नाहीत.
ओल्डमन सांगतात की, " कार्यालयात काम करण्यासाठी येणं अजूनही एखाद्या संस्थेची किंवा कंपनीची सामाजिक स्थिती मजबूत करत असल्याचं दिसतं.. या समस्येवर कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही मात करावी लागेल."
बॉस हायब्रिड वर्किंगमुळे नाखूष
वॉशिंग्टनमधील सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि सीईओ जॉनी सी. टेलर ज्युनियर म्हणतात की, कंपन्यांमध्ये उच्च पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचा एक वर्ग आहे ज्यांना हायब्रीड वर्किंग फारसं आवडत नाही.
त्यांनी बीबीसी वर्कलाइफला सांगितलं की काही प्रकरणांमध्ये, बॉसना असं वाटतं की हायब्रिड सिस्टीममधील समस्या सोडवण्याऐवजी कर्मचार्यांनी कार्यालयातील कामावर परत यावं. ते म्हणतात की काही सीईओंनी त्यांना सांगितलं की ते या सिस्टीमला कंटाळले आहेत.
अमेरिकेतील डिस्ने आणि इन्वेस्टमेंट कंपनी ब्लॅकरॉकने आता कर्मचाऱ्यांना चार दिवसांसाठी कार्यालयात बोलावणं सुरू केलं आहे आणि पुढील वर्षापासून नाइके पण तेच करणार आहे.
परंतु सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे अध्यक्ष टेलर म्हणतात की, अनेक ठिकाणी हायब्रिड व्यवस्था कायम राहील, कारण असे बरेच कर्मचारी असतील ज्यांना कार्यालयात पूर्णवेळ काम करण्यासाठी बोलावले तर ते येणं नाकारतील किंवा नोकरी सोडतील.
भारतातही हे घडत आहे. बंगळुरूमधील एका कन्स्लटिंग कंपनीत काम करणाऱ्या रोहित पराशर यांनी बीबीसीचे प्रतिनिधी आदर्श राठौड यांना सांगितलं की, त्यांच्या आधीच्या कंपनीनं हायब्रिड सिस्टीम बंद केली होती, त्यानंतर त्यांनी नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केली.
आता ते एका कंपनीत काम करत आहे जिथे त्यांना कायमस्वरूपी रिमोट वर्किंगची सुविधा देण्यात आली आहे.
यावर उपाय काय?
लंडनमधील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या मुख्य एचआर अधिकारी तनुज कपिलाश्रमी यांना विश्वास आहे की हायब्रिड वर्किंग पुढील आव्हानं सोडवली जाऊ शकतात.
त्याचं स्वत:चं क्षेत्र असं आहे की बहुतेक कामं प्रत्यक्ष जाऊनच करावी लागतात. पण त्या सांगतात की, रिमोट वर्किंगद्वारे कोणतं काम करता येतं हे पाहिलं जात, त्याआधारे कार्यालयात यावं की रिमोट वर्किंग करावं, याचं धोरण आखण्यात येतं.
त्यांनी बीबीसी वर्क लाइफला सांगितलं की, " ही व्यवस्था भविष्यातही सुरू राहील. त्यामुळे वर्क कल्चर बिघडण्याची चिंता न करता त्यातून उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याचे मार्ग शोधले पाहिजेत."
त्याच वेळी, लीसमॅनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टिम ओल्डमन म्हणतात की, अनेक दशकांपासून तयार झालेली कार्यप्रणाली बदलण्यास वेळ लागेल.
ते पुढे सांगतात की, "कोरोना साथ संपून फक्त एक वर्ष उलटलं आहे. हायब्रिड वर्किंगचा संस्थेतील वातावरण, कार्यसंस्कृतीवर, कर्मचार्यांच्या शिकण्यावर आणि करिअरवर काय परिणाम होतो याचा अभ्यास तेव्हाच करता येईल, जेव्हा ही व्यवस्था अनेक दशकं चालू राहील."