भांडी, फडकी आणि फ्रीज

१) शिजवलेले शिल्लक अन्नपदार्थ शिजवल्यापासून जास्तीत जास्त दोन तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवा. त्याहून जास्त काळ बाहेर राहिलेल्या अन्नपदार्थांमध्ये विघटनाची प्रक्रिया सुरू झालेली असते.
२) तुमचा फ्रिज किमान ४ डिग्री सेल्सिअस किंवा याहून कमी तपमानावर ठेवा. एवढय़ा तपमानात बहुतेक बॅक्टेरियांची वाढ थांबते त्यामुळे तुमचं अन्न सुरक्षित राहील.
३) एरवी अत्यंत स्वच्छ असलेल्या स्वयंपाकघरात ओटा आणि हात पुसण्याची फडकी मात्र बहुतेक वेळा अस्वच्छ असतात. ही फडकी आणि भांडी घासण्यासाठी वापरता ती घासणी जंतुनाशक द्रावणात उकळून नियमाने स्वच्छ करा. नळाखाली धरून नुसत्याच वाळत टाकलेल्या फडक्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ थांबवता येत नाही.
४) भाज्या चिरण्याची विळी, सुरी, साली काढण्याची सोलाणी या गोष्टी प्रत्येक वापरानंतर स्वच्छ धुतल्या/पुसल्या जातील याकडे लक्ष ठेवा. भाज्या आणि फळांच्या थेट संपर्कात येणारी ही रोजची आयुधं आपल्या ओल्या, अस्वच्छ कानाकोपर्‍यात बॅक्टेरियांच्या फौजा पोसतात. आणि अन्न दूषित करण्याला कारणीभूत ठरतात.
५) सर्व प्रकारचे प्राणिज पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ धुतलेले आणि इतर अन्नपदार्थांना त्यांचा संसर्ग होणार नाही अशा रीतीने डबा/प्लॅस्टिक पिशवीत बंद केलेले असतील, याची काळजी घ्या.
६) कच्ची अंडी खाणं त्यातील बॅक्टेरियांमुळे हानीकारक ठरू शकतं. अंडी खाण्यापूर्वी ती पूर्ण उकडलेली/शिजलेली असतील, याची दक्षता घ्या.
७) अन्न शिजवलेली रिकामी भांडी त्यातील खरकट्यासह रात्रभर तशीच (न घासता/धुता) ठेवणं, हे स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये हानीकारक बॅक्टेरियांच्या वाढीला निमंत्रण देण्यासारखंच असतं. तुमच्या घरातील स्वयंपाकाची भांडी उशिराने घासली जाणार असतील तर निदान ती तात्पुरती विसळून बाजूला ठेवा.
घासलेली भांडी ओलसर फडक्याने पुसण्याऐवजी ती पालथी घालून हवेने/उष्णतेने वाळू देणं अधिक योग्य आणि आरोग्यदायी असतं.

वेबदुनिया वर वाचा