समीक्षेचा मानदंड

PRPR
मराठी नाटकाची नांदी जिथे झाली त्या सांगलीत ८१ वे मराठी साहित्य संमेलन भरते आहे. या संमेलनाचे अध्यक्षपदही याच मातीत ज्यांचं कर्तृत्व बहरलं त्या ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांच्याकडे आले आहे या योगही चांगलाच जुळून आला आहे. पण त्याहून आणखी एक महत्त्वाचा योगही जुळून आला आहे, तो म्हणजे हे संमेलन ८१ वे असून हातकणंगलेकरांचे वयही ८१ वे आहे. थोडक्यात या संमेलनाचे अध्यक्षपद हा जणू सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आहे.

हातकणंगलेकरांचा जन्म १ फेब्रुवारी १९२७ ला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे झाला.

त्यांचा गावच्या मातीशी संबंध केवळ जन्मापुरता राहिला नाही, तो त्यांनी आयुष्यभर मिरवला. म्हणूनच शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी गावची माती सोडली नाही. उच्च शैक्षणिक संपदा असूनही पुणे, मुंबईचा मोह त्यांनी कटाक्षाने टाळला. मातीत राहूनच साहित्यसेवा करण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले. सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. आदर्श प्राध्यापक म्हणून १९७४ मध्ये सत्कारही करण्यात आला.

सांगलीसारख्या काहीशा आडवळणाच्या गावात राहूनच त्यांनी दिगंत कीर्ती मिळवली. साहित्यातील त्यांचा प्रांत त्यांनी समीक्षेच्या रूपाने निवडला होता. त्यांच्या समीक्षा हा मराठी समीक्षेतील मानदंड समजला जातो, यातूनच त्यांची महत्ता ओळखता येते. पण केवळ समीक्षा करूनच ते थांबले नाही, तर साहित्य क्षेत्रातील अनेक हिर्‍यांनाही पैलू पाडले. त्यांच्यातील चकाकी त्यांनीच दाखवून दिली.

किर्लोस्कर, सत्यकथा, वसंत यासारख्य दर्जेदार मासिकांमध्येही त्यांनी लेखन केले. 'साहित्यातील अधोरेखिते' हे त्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर आतापर्यंत त्यांची डझनाहून अधिक पुस्तके आली आहेत. त्यात बहुतांश पुस्तके समीक्षात्मक आहेत. हातकणंगलेकर प्रामुख्याने समीक्षक म्हणूनच ओळखले जातात. कारण समीक्षा म्हणजे काही तरी जड, कठीण व सामांन्यांच्या आकलनापलिकडचे असा एक ग्रह आहे, तो त्यांनी मोडून काढला. समीक्षात्मक लिखाण सामान्यही वाचू शकतात, हे त्यांच्या लिखाणावरून कळते. त्याचप्रमाणे समीक्षा अर्थात टीकाकार म्हणजे टीका करणारा हे मतही त्यांनी खोडून काढले. समीक्षक हा सौंदर्याचा आस्वादक असतो, आणि त्याला जाणवलेले साहित्यकृतीचे सौंदर्य तो वाचकांनाही उलगडून दाखवितो, हे हातकणंगलेकरांच्या समीक्षेवरून स्पष्ट होते.

त्यांची समीक्षा म्हणजे टीकेची झोड उठविणारी आणि जुन्या मतांना चिकटून राहणारी नव्हती. कारण हातकणंगलेकर हे नव्याचे स्वागत करणारे आहेत. नव्या प्रयोगांविषयी त्यांना ममत्व आहे. म्हणूनच नवकथेमागे ते ठामपणे उभे राहिले. त्याचबरोबर मराठीत दाखल होत असलेल्या नवनव्या साहित्य प्रकारांवर आणि नवनव्या क्षेत्रातून, जातीतून येणार्‍या लेखकांच्या लेखनाचेही त्यांनी स्वागत केले. त्यांच्यातील जे जे चांगलं होतं ते त्यांनी उलगडून दाखविलं. दलित, स्त्रीवादी, आंबेडकरवादी, भटके विमु्क्त असे सगळे साहित्य प्रवाह त्यांनी मायेने अभ्यासले आणि त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहिले. हातकणंगलेकरांची समीक्षा वेगळी ठरते ती अशी.

हातकणंगलेकर समीक्षक असले तरी रूक्ष नाहीत. त्यांना माणसे आवडतात. त्यांना भेटणे आवडते आणि त्यांच्याशी मैत्री करणेही आवडते. म्हणूनच अनेकांशी त्यांचै मैत्र जडले आहे. सगळ्यांच्या दृष्टीने गूढ राहिलेल्या जी. ए. कुलकर्णींशीही त्यांचा अतिशय घट्ट स्नेह होता. म्हणूनच त्यांच्या निवडक पत्रांचे संपादन त्यांनी केले आहे. शिवाय त्यांच्या पिंगळावेळ व हिरवे रावे या कथासंग्रहांचे संपादनही त्यांनी केले आहे. आपल्या स्नेह्यांविषयीसुद्धा हातकणंगलेकरांनी हातचं न राखता लिहिले आहे.'आठवणीतील माणसे' आणि साहित्य सोबती' ही त्यांची याच विषयावरची पुस्तके आहेत. 'उघडझाप' या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्याचा पट अतिशय छानपणे त्यांनी उलगडून दाखविला आहे. गो. नी. दांडेकरांचे माचीवरला बुधा व व्यंकटेश माडगूळकरांचे सती ही दोन पुस्तके त्यांनी इंग्रजीत अनुवादीत केली.

अशा या तपस्वी सारस्वताने साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत नशीब आजमाविण्याचा प्रयत्न २००२ मध्ये केला होता. पण त्यावेळी त्यांना राजेंद्र बनहट्टी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. पण आता सांगली या त्यांच्या कर्मभूमीत अखेर त्यांना हे पद मिळाले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा.

हातकणंगलेकरांची साहित्यसंपद
लेखन: इंग्रजी अणि मराठी समीक्षेत मिळून एकंदर १५ पुस्तकांचे लेखन. त्यातील ' साहित्याची अधोरेखिते ', ' साहित्याचे सोबती ', ' मराठी कथा रुप आणि परिसर ' तसेच ' साहित्य विवेक ' ही पुस्तके विशेष गाजली. तसेच जी. ए. कुलकणीर् यांच्या ' डोहकाळिमा ' कथासंग्रहाचे संपादन. पॉप्युलर प्रकाशनातफेर् ' मराठी वाङम्यातील प्रेरणा आणि प्रवाह:१९५० ते ७५ ' सहसंपादक. १९८६ मध्ये ' उगवाई ' नियतकालिक सुरू. ' सत्यकथे ' तून सातत्याने लेखन. ' उघडझाप ' हे आत्मचरित्र. जी. ए. कुलकणीर् स्मृती सदन धारवाड याची स्थापना. साहित्य संस्कृती मंडळ , विश्वकोष निमिती मंडळ आणि साहित्य अकादमी, ज्ञानपीठ समिती, कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये कार्य.

वेबदुनिया वर वाचा