सांगली येथे उद्यापासून सुरू होत असलेल्या 81 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी 'वसंतदादा साहित्यनगरी' सज्ज झाली असून संमेलनाच्या उदघाटनासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येणार असल्यामुळे शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याप्रसंगी शहरातील विविध चौकांचे सुशोभिकरण व रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून साहित्यीकांच्या स्वागतासाठी विलिंग्डन महाविद्यालयाचा परिसर सज्ज झाला आहे.
या संमेलनासाठी महाराष्ट्र तसेच बाहेरूनही किमान पाच हजार प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. या सगळ्यांची भोजन, नाष्टा, चहापान व्यवस्था करण्यात आली आहे.
या संमेलनासाठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्रभरातून विक्रेते येथे आले आहेत. मोठमोठ्या प्रकाशनांनीही त्यांचे स्टॉल येथे उभारले आहेत.
शहरात राष्ट्रपती येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी 200 राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच संमेलन परिसराची हेलिकॉप्टरने टेहळणी करण्यात येत आहे.
साहित्यनगरीत 10,000 साहित्यक दाखल झाले आहेत. या सहित्यीकांच्या उपस्थित शुक्रवारी (दि.18) दुपारी दोन वाजता भव्य ग्रंथ दिंडी निघणार आहे. ग्रंथदिंडीचे स्वरूप 'ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी' असेल असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितले.