हिंदी गाणीही गाईन- मुग्धा

WDWD
'सारेगमप'मध्ये जेमतेम आठ वर्षाची आणि दोन फुटाची उंची असलेली मुग्धा गायला लागले की परीक्षकांसह प्रेक्षकही मुग्ध होऊन जायचे. गाण्यात, सुरात पक्की असलेली मुग्धा मात्र प्रत्यक्षात भलतीच अवखळ आहे. मुलाखत देतानाही तिचा अवखळपणा दिसून येत होता. तिच्या बोलण्यात व्यत्यय आणणार्‍या रोहितची तिने 'कट्टी' घेतली. मग ती बोलत असताना मध्येच बोलणार्‍या कार्तिकीकडेही तिने डोळे वटारून पाहिले.

गाणं हेच करीयर असल्याचं तिने आतापासूनच ठरवून टाकले आहे. त्याचबरोबर शास्त्रीय संगीत हेही करीयर म्हणून ती स्वीकारणार आहे. अर्थात, मराठीशिवाय कोणतीही भाषा कळत नसलेल्या या चिमुरडीचा हिंदी गाणी गायला ना नाही.

स्पर्धेतील मुग्धाची लोकप्रियता किती होती, हे तिला मिळणार्‍या एसएमएसच्या प्रचंड संख्येवरूनही कळून येत होते. मग या अपेक्षांचं दडपण येत नाही का? असं विचारलं असता 'नाही' असं धीट उत्तर ती देते. खूप लोक ओळखू लागल्याने आता 'सेलिब्रेटी' झाल्यासारखं वाटतंय का? असं विचारल्यावर 'आम्ही मोठे नाही. लोकांनाच तसं वाटतं,' असं उत्तर ती देते.

स्पर्धेतला बाहेर पडण्याचा भाग तिला फार धोकादायक वाटायचा. बाहेर जाणे म्हणजे इथला प्रवास संपणे असे वाटते. कुणीही स्पर्धेतून गेल्यानंतर तिला वाईट वाटायचे. पण हा सगळा प्रवास करून इथपर्यंत आल्यानंतरही ती साधीच आहे. तशीच अवखळ नि निरागस.

वेबदुनिया वर वाचा