(मुंबई विद्यापीठात व्याख्यातापदासाठी अर्ज केलेल्या नानी पालखीवाला यांची निवड झाली नव्हती. एका अर्थी ते बरेच झाले. कारण त्यामुळे देशाला एक विद्वान विधीज्ञ मिळाला. 1944 मध्ये मुंबई येथे सर जमशेदजी बेहरामजी कांगा यांच्या हाताखाली सहायक वकील म्हणून काम करण्यास सुरवात केल्यानंतर त्यांनी एक एक शिखर पार केले. वयाच्या 30 व्या वर्षी 'लॉ अँड प्रॅक्टीस ऑफ इन्कम टॅक्स' नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले होते. लोक आजही त्या पुस्तकाचा उपयोग करत आहेत. केवळ दहा वर्षाच्या अनुभवानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात काम करण्यास सुरवात केली. पालखीवाला भारतीय राज्य घटनेला मानवाच्या विकासाचा आधार मानत होते. केरळच्या केशवानंद यांचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालू असताना त्यांची विद्वत्ता दिसून आली.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यासंदर्भात पालखीवाला यांचे म्हणणे ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. त्या जमलेल्या गर्दीवरूनच त्यांच्याविषयी लोकांमध्ये असलेली उत्सुकता दिसून येते. आज हयात नसले तरी न्यायपालिका, कायदेतज्ज्ञ आणि कार्पोरेट जगातील मोठमोठे लोक त्यांची आदराने आठवण करतात. स्वातंत्र्यानंतरचा तत्कालीन युवावर्ग उत्साहात होता. परंतु, आज त्याची नैतिकता ढासळली आहे. 1997 मध्ये आयआयटीच्या संयुक्त प्रवेश परिक्षेचा पेपर फुटणे हे त्याचे उत्तम उदाहरण होय.)
भारतीय प्रजासत्ताक गेल्या ६० वर्षांपासून अखंड आहे. जगातील लोकसंख्येपैकी १/६ लोकसंख्या भारतात राहते. विविध जातीधर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. हे जगातील एक ऐतिहासिक उदाहरण आहे. जागतिक महायुद्धानंतर भारतीय प्रजासत्ताकाच्या अस्तित्वाला टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापक रोस्टो ही एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे मानतात.
आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता ब्रिटनपेक्षा अधिक चांगली आहे. कारण येथे रोमन कॅथलिक राजा किंवा लॉर्ड चॅन्सेलर बनू शकत नाही. आपल्या देशाची राज्यघटना अमेरिकेपेक्षा श्रेष्ठ आहे. भारतीय राज्यघटनेत लैंगिक समानतेचा एक अधिकार देण्यात आला आहे. परंतु, अशा प्रकारचा अधिकार अमेरिकन राज्यघटनेत समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. आपल्या राज्यघटनेने आपल्याला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज केले आहे, असे आपण अभिमानाने बोलू शकतो. जगातील विविध जातीधर्माचे लोक येथे आनंदाने राहतात. भारतासारखा दुसरा कोणताही प्रजासत्ताक देश अस्तित्वात नाही. हे एक मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. येथे विविध लिपित लिहिल्या जाणार्या पंधरा भाषा आणि सुमारे अडीचशे बोलीभाषा बोलल्या जातात.
भारताचा इतिहास पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक बॅंकेने भारतासाठी लागू केलेल्या एका अहवालात दोन घटकांचा उल्लेख केला होता. भारत देश रोजगारासाठी नवनवीन योजना आणि सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश असून येथे मनुष्यबळाची कमतरता नाही. दुसरा घटक म्हणजे येथील लोकांच्या अंगी जन्मत: व्यापारी वृत्तीचा समावेश आहे.
भारतावर निसर्गाचीही विशेष कृपा आहे. देशावर संकटे आली, तेव्हा महामानवाला जन्म देऊन निसर्गाने देशावर उपकार केले आहेत. अशा प्रकारच्या नेत्यांवर देशातील कोट्यावधी जनता विश्वास ठेवते. सध्याची युवा पिढी अशाच लोकनेत्याच्या प्रतिक्षेत आहे, जो त्यांना नैतिक मुल्यांचे शिक्षण देऊ शकेल. एकेकाळी हेच काम महात्मा गांधींनी केले होते.
भारताची एकात्मता आणि एकता आज संकटात आली असल्याचे दिसून येते. भारतीय राजकारण, संस्कृती- सहिष्णुता यांचीही स्थिती चिंताजनक आहे. पण ही ओळखही पुसली जाईल. स्वतःची प्रतिष्ठा भारत पुन्हा एकदा प्राप्त करेल. आपली स्वत:ची राष्ट्रीय ओळख निर्माण करणे हे भारतासमोरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आपल्या सामाजिक रूढी परंपरा, संस्कृतीची जोपासना करणार्या समाजाचे रक्षण पुढील काळात आपल्याला करावे लागेल.
(ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ डिफेंन्स स्ट्रॅटेजिक स्टडीज येथे केलेल्या भाषणाचा सारांश.)