अक्षरबंध फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा

शुक्रवार, 29 जुलै 2022 (21:32 IST)
अक्षरबंध फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यात लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, राजेंद्र उगले, डॉ. स्मिता दातार, वीणा रारावीकर, डॉ. राजेंद्र राऊत, प्रसाद खापरे यांच्या साहित्यकृतींची निवड करण्यात आली. तसेच सटाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक शंकर कापडणीस यांना त्यांच्या साहित्यसेवेची दखल घेऊन ‘अक्षरबंध जीवनगौरव’ पुरस्काराने तर ‘अक्षरबंध साहित्यरत्न’ पुरस्काराने निशा डांगे (पुसद) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
 
मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा गौरव करण्याच्या उद्देशाने अक्षरबंध परिवाराने या वर्षापासून राज्यस्तरीय ‘अक्षरबंध’ साहित्य पुरस्कार सुरू केले आहे. या पुरस्कारांसाठी सर्व साहित्य प्रकारांत एकूण ३४५ साहित्यकृतींचे प्रस्ताव आले होते. त्यातून परीक्षकांनी या साहित्यकृतींची निवड केली. पुरस्कारांचे लवकरच नाशिक येथे एका कार्यक्रमात वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण जोंधळे, उपाध्यक्ष सप्तर्षी माळी, सचिव साई बागडे, खजिनदार किशोरी बावके, सदस्य कल्याणी देशपांडे, डॉ. गणेश मोगल, योगेश विधाते यांनी दिली.
 
पुरस्काराचे स्वरूप रोख तीन हजार, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असून अक्षरबंध परिवारातील शं. क. कापडणीस, सटाणा, सरोजिनी देवरे, मुंबई, डी. के. चौधरी, तळेगाव, दीपाली महाजन, पुणे, दीपाली मोगल-बोंबले, नाशिक, कपिल भालके, ओझर, सुयश कॉम्प्युटर, ओझर, दशरथ ढोकणे, शेवगेदारणा यांनी दहा वर्षासाठी पुरस्कार पुरस्कृत केले आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकाला ‘अक्षरबंध जीवनगौरव सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार असून रोख पाच हजार, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून आबा शिंदे, ओझर यांनी पुरस्कृत केला आहे. सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अक्षरबंध परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती