तिला जगू द्या

ती इवलीशी उमलती कळी
नाजूक पारंबीवर नटलेली
सुंदर फूल होवू द्या न तिला..
हक्क आहे तिला पण
फांदीवर बसून डोलण्याचा
सारे रंग पांघरून घेण्याचा
तिला तिचा सुगंध
वा-यात पसरवू द्या..
रानफुलासारखे वावरू द्या..
मंद वा-यात झुलू द्या
तिला आनंदाने फूलू द्या ....
 
ती चिमुकली चिमणी
नुकतीच घरट्यातून निघालेली..
सुरेल पक्षी होवू द्या न तिला
हक्क आहे तिला पण
मंजूळ स्वरात गाण्याचा
स्वच्छंद पंख फुलविण्याचा..
उंच आकाशात झेप घेण्याचा..
त्या इंद्रधनुला ओलांडून
क्षितिजाला स्पर्श करण्याचा..
तिला पंख पसरवून उडू द्या 
उन्मुक्त भरारी घेवू द्या .....
 
ती अरुंद जलधारा 
पर्वताच्या कुशीतून निघालेली
खळखळणारी नदी होवू द्या न तिला
हक्क आहे तिला पण 
खडकांना ओलांडून पुढे जाण्याचा
दरी मैदानात सैराट धावण्याचा
अडथळ्यांना झुंझ देत वाहण्याचा
जगाची तहान भागवण्याचा
वळसे घेत नवे किनारे शोधण्याचा
तिला थेठ तो समुद्र गाठू द्या
जलबाष्प होवून आकाशाला भेटू द्या...
तिला मनाप्रमाणे जगु द्या...
 
- ऋचा दीपक कर्पे


 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती