बाप माझा विठ्ठल विठ्ठल

सोमवार, 19 जुलै 2021 (13:58 IST)
बाप माझा विठ्ठल विठ्ठल
जाडे भरडे कपडे घालून
दाळ-दाणा आणतो
बाजार संपून जाऊसतोर
बाप चकरा हाणतो
 
बैल होतो हमाल होतो
कष्ट उपसतो खूप
बाप म्हणजे काळसावळ
विठलाचं रूप
 
ऊन नाही तहान नाही
दिवस रात्र राबतो
घर जातं झोपी पण
बाप एकटा जागतो
 
लेकराच्या भल्यासाठी
अपमान गिळत राहतो
पाटी आणि पेन्सिलकडे
बाप एकटक पाहतो
 
पोराच्या डोक्यावरून
फिरवतो झोपित हात
खुशाल ठेव देवा म्हणून
जोडीत राहतो हात
 
दिसतो तेवढा बाप कधीच
कठोर रागीट नसतो
खरं सांगतो बाप म्हणजे
आईचंच रूप असतो
 
घळा घळा आसवं गाळून
मोकळी होते माय
 
दुःख दाबून बाप दाबतो
सावकाराचे पाय
 
हो म्हणतो लेकरासाठी
पडेल ते काम करील
त्याला साहेब करण्यासाठी
मी नाच करील
 
खिळे काटे दगड गोटे
पायात घुसत जातात
अंधारात त्याच्या वेदना
पाणी पाणी होतात
 
कसं होईल काय होईल
चैन पडत नाही
बाप नावाचा संत कधी
दिवसा रडत नाही
 
फादरचा " डे " फक्त
वर्षातून एकदा असेल का ?
बैल गोठ्यात बसल्यावर
शिवार हिरवं दिसेल का ?
 
सारं दुःख पोटात गिळून
मानेवर " जू " घेतो
तोंडातून रक्त आलं तरी
गाडा ओढीत राहतो
 
रक्ताचे थेंब दिसूने म्हणून
तोच टाकतो माती
बाप ज्याला कळतो त्याची
फुटून जाती छाती
 
आमच्यासाठी काय केलं
असं विचारू नका
म्हाताऱ्या बैलावर
वार करू नका
 
बापाची तिरडी उचलण्या आधी
पोरांनी शहाणं व्हावं
बाप माझा विठ्ठल विठल
भजनी ठेक्यात गावं
 
प्रा.विजय पोहनेरकर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती