नाटकी बगळा

उन्हाळ्यामुळे नद्या, नाले, ओढे, ओहोळ कोरडे पडू लागले. अशावेळी एका बगळ्याची नजर दूरवर असलेल्या एका तळ्याकडे लागली होती. तळ्यात खूप मासे फिरत असलेले त्याला दिसत होते. आपल्याला ते कसे मिळतील यावर विचार करत तो तळ्याकाठी आला. 
 
तळ्यात उतरून एक पाय उचलून आणि चोच वर करून त्याने डोळे मिटले व "राम राम" म्हणू लागला. त्याला तिथे बघून काठावरचे मासे तळ्यात गेले. बगळ्याचं आपलं राम राम सुरूच होतं. त्यावर एका मासा त्याच्याजवळ येऊन म्हणाला, "बगळेबुवा, तुम्ही आम्हाला खात कसे नाही?" या क्षणाची वाट बघत असलेला बगळा म्हणाला, "अरे, आता मी मासे खाणे सोडून दिले. मी फक्त पाण्यात उभे राहून ध्यान करतो व तोंडाने "राम राम" म्हणतो. 
 
हे कळल्यावर आणि प्रत्यक्षात बघितल्यावर मासे धीट झाले. ते बिनधास्त त्याच्याजवळून पोहू लागले. दिवस सरत गेले. काही दिवसांनी बगळा म्हणाला, "तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळा वाढतो आहे आणि काही काळात या तळ्याचे पाणी आटणार?" 
 
यावर एक मासा म्हणाला "मग आम्ही जायचे कोठे? 
त्यावर बगळा म्हणाला, "या डोंगरापलीकडे एक मोठे तळे आहे. त्यात खूप पाणी आहे." 
मासे म्हणाले. "पण आम्ही त्या तळ्यात कसे जाणार? " 
यावर बगळा म्हणाला, मी तुम्हाला तिकडे नेऊ शकेन, पण एका वेळी फक्त चौघांना. 
सगळे मासे खुशीने म्हणाले "हो हो. आम्ही नक्की येऊ."
 
दुसरे दिवशी बगळ्याने आपल्या चोचीत चार मासे घेतले आणि डोंगराच्या माथ्यावर येऊन थांबला. 
मासे म्हणाले, "आपले तळे कुठे आहे?" 
त्यावर बगळा म्हणाला, "तळे कुठचे नाही. मी आता तुम्हाला खाणार आहे." असे म्हणून त्याने मासे खाऊन टाकले. असेच तो बरेच दिवस रोज मासे पलीकडे नेऊन खायला लागला. 
 
एक दिवशी खेकडा त्याजवळ येऊन म्हणाला मला नेणार का? 
बगळा मनात म्हणाला, "मी रोज मासे खातो आहे. चला आज खेकडा खाऊ." त्याला घेऊन बगळा उडाला व नेहमीप्रमाणे डोंगरावर उतरू लागला. हे बघता खेकड्याला त्याचा डाव कळला आणि खेकड्याने आपल्या नांग्या त्याच्या मानेत रुतवल्या. बगळ्याने आपले प्राण सोडले आणि खेकडा परत आपल्या तळ्यावर येऊन माशांना घडलेला प्रकार सांगितला. अशा रितीने बाकीचे मासे तळ्यात सुखरूप नांदू लागले.

वेबदुनिया वर वाचा