मं
गळ ग्रहाच्या सूर्याबरोबर होणार्या प्रतियुतीच्या दर्शनाची संधी खगोलप्रेमींना ८ एप्रिल रोजी मिळणार आहे. सायंकाळी ७.३0 ते १0.३0 या वेळात ही प्रतियुती पाहता येणार आहे. मंगळ ग्रह आणि पृथ्वी यांच्या भ्रमणकक्षांमुळे ही खगोलीय घटना घडते. स्वयंचलित दुर्बिणीतून जिज्ञासूंना ही घटना अनुभवता येणार आहे. मंगळ ग्रह सध्या कन्या राशीत आहे. त्याची तेजस्विता १.५ इतकी आहे. या काळात तो पृथ्वीच्या निकट म्हणजे ९.२९ कोटी किलोमीटरवर आहे. त्यामुळे प्रतियुती पाहणे हा एक वेगळा अनुभव ठरणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. सध्या मंगळ पृथ्वीच्या जवळ आला असल्याने मंगळाचा पृष्ठभाग, त्याच्या ध्रुवीय बर्फाच्या टोप्या यांचेही निरीक्षण करण्याची संधी जिज्ञासूंना मिळू शकेल. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि मंगळ यांच्यामधून जाते, तेव्हा पृथ्वीवरून पाहताना मंगळ सूर्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असतो, यालाच प्रतियुती असे म्हटले जाते. या वेळी सूर्य, पृथ्वी आणि मंगळ साधारणत: एका सरळ रेषेत येतात.