माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी

मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (10:17 IST)
कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. 
बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. 
 
लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. 
 
बायका काय वाटेल ते बोलतात. "शी ! कसले हो हे भडक रंग.!"
लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्या सारखा चेहरा करुन असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा.! 
समोरची बाई म्हणत असते,"कसला हा भरजरी पोत.!" हा शांत. 
गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाही तर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते. 
समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, 
अथोक्षजाय नम:।
अच्युताय नम:।
उपेंद्राय नम:। 
नरसिंहाय नम:।
ह्या चालीवर सांगत असतो.
 
सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच, "ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं.?"
एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच. 
आपली स्वतःची बायको असून सुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. 
पण कापड दुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात, "नारायण, इचलकरंजी लेमन घे !
 
खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.
 
-- पु. ल. देशपांडे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती