उन्हाळ्यात काय आहार घ्यावा, जाणून घ्या

सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (13:59 IST)
उन्हाळ्यात उष्णता वाढते. बाहेरच्या उष्णतेबरोबरच शरीरातील उष्णताही वाढते. त्यामुळे या काळात शरीर थंड ठेवण्यासाठी आहारही तसा घ्यायला हवा ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल. चला तर मग उन्हाळ्यात कोणता आहार घ्यावा जाणून घेऊ या. 
 
* उन्हाळ्यात थंडाई, ब्राह्मी, खस, चंदन, डाळिंब, मध, मोसंबी, लिंबू इत्यादींचे सरबत सकाळ व संध्याकाळी घ्यायला पाहिजे. जवसाच्या सत्त्वात साखर टाकून थंड पाण्यात मिसळून त्याचे सेवन करावे. हे पेय तृप्ती देणारे, पौष्टिक व थंड असते.
 
* उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी थंड दूध किंवा दह्याची लस्सी, ताक, नारळाचे पाणी, ऊसाचा रस व ताज्या फळांचा रस व लिंबाचे सरबत हे उत्कृष्ट पेय आहे. हे पेय पदार्थ दिवसांतून 2-3 वेळा घेऊ शकता.
 
* उन्हाळ्यात आंबट पदार्थ उदा. कैरी व चिंचसुद्घा उपयुक्त ठरतात. कैरीचे पन्हे गर्मीपासून बचावासाठी अवश्य घ्यावे. आवळासुद्घा शरीरातील उष्णता कमी करतो. आवळ्याचे सरबत, मुरांबा शरीर व मेंदूला थंडावा देतात. हे पदार्थ बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. 
 
* कलिंगडाचे सेवन करणे चांगले. पण सोबत दूध घेणे टाळावे. त्याच प्रकारे टरबूज, काकडी रिकाम्या पोटी घेणे हानिकारक असते. टरबूज व काकडी हे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतात.
 
* उन्हाळ्यात बर्फाचे सेवन जास्त केले जाते. बर्फ़ाने सुरवातीला छान वाटते. पण बर्फाच्या जास्त सेवनाने दात कमजोर होतात. बर्फाऐवजी माठातील थंड पाणी वापरल्यास उत्तम. 
 
* उन्हाळ्यात दररोज चे जेवण- जवस, गहू, ज्वारीची पोळी, मुगाची, तुर व मसूरीच्या डाळीचे वरण, पातळ कढी, भात, दही किंवा ताक असे हवे. भाज्यांमध्ये - घोसाळी, चिवळीची भाजी कैरीसोबत, कांदे, शेवग्याच्या शेंगा इत्यादीचे सेवन केले पाहिजे. 
 
* उन्हाळ्यात कच्चा कांदा, हिरवी कोथिंबीर व पुदिन्याची चटणी आतड्यांना थंडावा देतात.
दुपारच्या वेळी भूक लागल्यास फुटाण्यासोबत थंड पाणी घ्यावे.
 
*  संध्याकाळचे जेवण शक्यतो हलके व कमी घेतल्यास फायदा मिळतो. रात्रीच्या वेळी झोपण्या अगोदर दूध घेतले पाहिजे. चहाचे सेवन शक्यतो टाळावे. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिल्यास शरीरास त्याचा फायदा होतो.
 
* दुपारच्या वेळी 1-2 तासाची झोप घेतल्यास आराम मिळतो व शरीर ताजेतवाने राहते. कूलर व एअरकंडीश्नरचा वापर जेवढे शक्य असल्यास तेवढा कमी करावा. उन्हाळ्यात पांढरे, सुती किंवा खादीचे कपडे वापरणं चांगलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती