हे 8 पदार्थ खाल्ले तर पोटात गॅस होईल, पण...

सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (08:58 IST)
पादणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. सर्वसामान्य मनुष्य दिवसातून 5 ते 15 वेळा पादतो. किंबहुना एखाद्या विशिष्ट दिवशी खूप गॅस होणं हे सुदृढ आरोग्याचं लक्षण असू शकतं.
 
अर्थात, त्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता आणि लाजीरवाणी स्थिती, हा भाग वेगळा. पादण्याला कारणीभूत ठरणारे पदार्थ हृदयासाठी आरोग्यकारक, तंतुमय कर्बोदकं राखणारे असण्याची शक्यता असते.
 
आपल्या शरीराला ही गुंतागुंतीची कर्बोदकं वेगवेगळी करता येत नाहीत, पण आपल्या आतड्यांमधील जीवाणू हे काम करू शकतात.
तर, कोणते पदार्थ खाल्यावर आपल्याला पादू येतं, कोणत्या पदार्थांमुळे पादल्यानंतर घाण वास येतो आणि कोणत्या स्थितीत डॉक्टरशी सल्लामसलत करणं आवश्यक असतं?
 
1. चरबीयुक्त पदार्थ
 
चरबीयुक्त पदार्थांमुळे पचनक्रिया मंदावते, त्यामुळे हे पदार्थ आपल्या आतड्यांमध्ये चिघळत, आंबत राहण्याची शक्यता असते आणि त्यातून दुर्गंधी निर्माण होते. चरबीयुक्त मांस विशेषकरून पेच निर्माण करणारं असतं, कारण त्यात अमिनो आम्ल, मेथिओनिन मोठ्या प्रमाणात असतं आणि गंधकही असतं.
 
आपल्या आतड्यांमधील जीवाणू गंधकाचं विभाजन करून हायड्रोजन सल्फाइडची निर्मिती करतात. याचा वास कुजलेल्या अंड्यासारखा येतो. त्यामुळे मग इतर अन्नपदार्थांसह आपण खाल्लेल्या मांसातून उत्पन्न झालेल्या गॅसची दुर्गंधी वाढते.
 
2. द्विदल धान्यं
द्विदल धान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतू असतात, पण त्यात रॅफिनोजसुद्धा असते. रॅफिनोज ही आपल्या शरीराला धडपणे प्रक्रिया न करता येणारी साखर असते. ही साखर आतड्यांमध्ये जाते आणि आतडी त्याचा वापर ऊर्जेसाठी करतात. या प्रक्रियेत हायड्रोजन, मिथेन आणि दुर्गंधीयुक्त गंधकाची निर्मिती होते.
 
3. अंडी
या संदर्भात लोकांमध्ये विविध समज प्रसृत आहेत, पण अंड्यांमुळे आपल्यातील बहुतेकांना गॅसचा त्रास होत नाही. पण त्यात गंधकमिश्रित मिथिओनिन असतं. त्यामुळे तुम्हाला दुर्गंधीयुक्त पादायचं नसेल, तर कडधान्य वा चरबीयुक्त मांसासोबत अंडी खाऊ नका.
 
अंडी खाल्ल्यावर तुमचं पोट फुगत असेल आणि पादू येत असेल, तर तुम्हाला अंडी धडपणे पचत नाहीत किंवा तुम्हाला त्यांची अॅलर्जी आहे, असं म्हणता येईल.
 
4. कांदे
कांदे, लसूण आणि तत्सम पदार्थांमध्ये फ्रुक्टन आणि कर्बोदकं असतात त्यातून गॅस निर्माण होऊ शकतो आणि पोट फुगू शकतं.
 
5. दुग्धजन्य पदार्थ
गायी आणि बकऱ्या यांच्यापासून मिळणाऱ्या दुधात लॅक्टोस असतं. ही साखर गॅस वाढायला कारणीभूत ठरते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे जगातील सुमारे 65 टक्के प्रौढ लोकांना लॅक्टोस पचायला जड जातं आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने त्यांना गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते.
6. गहू आणि अख्खी धान्यं
गॅस निर्माण करणारे फ्रुक्टन आणि तंतू गव्हाच्या उत्पादनांमध्ये आणि ओट्ससारख्या धान्यांमध्ये असतात. त्यामुळे ब्रेड, पास्ता आणि अख्खी धान्य पादण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
 
त्याहून महत्त्वाचं म्हणजे गहू, सातू आणि राय यांसारख्या काही अख्ख्या धान्यांमध्ये ग्लुटेन असतं. ग्लुटेन पचवता न आल्यामुळे असे अन्नपदार्थ खाल्ल्यावर गॅस होणं किंवा पोट फुगणं आदी प्रकार घडतात.
 
7. कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली
कोबी, ब्रोकोली, कॉलीफ्लोवर, कडधान्यं आणि इतर पालेभाज्या तंतूंनी संपन्न असतात आणि हे सर्व पचवणं तुमच्या शरीराला अवघड जाऊ शकतं. पण तुमच्या आतड्यांमधील जीवाणूंना याचा वापर ऊर्जेसाठी करणं आवडतं आणि यातून गॅस निर्माण होतो. अशा अनेक भाज्यांमध्ये गंधक असतं, त्यामुळे त्यातून कसा वास येईल याचा अंदाज तुम्हाला असेलच.
 
8. फळं
सफरचंद, आंबे आणि पीअर यांसारख्या अनेक फळांमध्ये नैसर्गिक साखरेचं फ्रुक्टोस मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय, काही सफरचंद आणि पीअरमध्ये तंतू जास्त असतात.
 
अनेक लोकांना फ्रुक्टोज पचवणं अवघड जातं आणि हे गोड पदार्थ खाल्ल्याने त्यांना गॅस होऊ शकतो, कारण साखरेचं विभाजन करणं त्यांना शक्य होत नाही.
 
पण लॅक्टोस पचवणं जितक्या लोकांना अवघड जातं तितक्या प्रमाणात फ्रुक्टोस पचवणं अवघड जात नाही.
पादणं थांबवता येतं का?
फळं, भाज्या आणि डाळी यामुळे गॅस होऊ शकतो, पण पादणं थांबवण्यापेक्षा यातील अनेक पदार्थ दर दिवशी खाणं जास्त महत्त्वाचं असतं. तु
 
म्ही तंतुमय पदार्थ आधीपासूनच खात नसाल, तर अचाकन त्याचं प्रमाण वाढवल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. विपरित परिणाम टाळण्यासाठी तुमच्या आहारात तंतुमय पदार्थ हळूहळू वाढवत न्या.
 
शरीरातील पाणी टिकवून ठेवल्याने बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो, त्यातून गॅस वाढू शकतो. मल आतड्यामध्येच राहिला, तर तिथे आंबण्याची प्रक्रिया सुरू होते, आणि विशेष दुर्गंधी असलेला गॅस निर्माण होतो.
 
प्रत्येक वेळी जेवणासोबत काहीतरी प्या आणि दिवसभर पाणी पित राहाल असं पाहा. गॅस कमी होण्यासाठी आणि फुगलेलं पोट निवळण्यासाठी पेपरमिंट किंवा चहा पिण्याचा सल्ला डॉक्टर्ससुद्धा देतात.
 
फेसाळत्या पेयांमध्ये गॅस असतो, त्यामुळे अशी पेयं जास्त प्यायल्याने जास्त पादण्याची शक्यता असते. च्युईंग गम खाणं किंवा चमच्याने सूप पिणं यांमुळेसुद्धा गॅस धरतो. आपण हवा पोटात जाऊ देतो तेव्हा तिचं काहीतरी रूपांतर होणं स्वाभाविकच आहे.
 
याची चिंता बाळगायला हवी का?
बहुतांश वेळा पादणं किंवा गॅस होणं चिंताजनक नसतं. गॅसच्या अनेक निरुपद्रवी कारणांवर उपचारांची किंवा काही मूल्यमापन करण्याची गरज नसते.
 
काही वेळा अतिरिक्त गॅस इतर कोणत्यातरी अंतःस्थ शारीरिक स्थितीची खूण दाखवणारा असू शकतो, अशा वेळी डॉक्टरची भेट घेणं चांगलं.
 
दुर्गंधीयुक्त पादणं हा काही औषधांचं आनुषंगिक परिणामसुद्धा असू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती