Cristiano Ronaldo: कोका कोला, पेप्सी आणि इतर सॉफ्टड्रिंक्स आरोग्यासाठी वाईट असतात का?

गुरूवार, 17 जून 2021 (20:58 IST)
फुटबॉलर रोनाल्डोने कोकची बाटली बाजूला केली आणि कोका कोला कंपनीला अब्जावधींचा फटका बसला. सॉफ्ट ड्रिंक्स खरंच शरीराला अपाय करतात का हा प्रश्न त्यामुळे पुन्हा चर्चेत आला. प्रमाणाबाहेर सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्याने आरोग्य बिघडतं का? हे प्रमाण नेमकं कसं निश्चित करायचं?
 
उन्हाळ्याच्या काळात सॉफ्ट ड्रिंक्सचा खप सर्रास वाढतो. काहींना सोडा असलेली पेयं आवडतात तर काहींना सोडा नसलेली. पण तात्पुरता दिलासा मिळत असला तरी या सगळ्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतात?
 
पेप्सी, कोकसारखी पेयं आरोग्याला घातक असतात का?
साखरयुक्त बाटलीबंद पेयं आपल्या शरीराला इजा पोहोचवू शकतात असं तज्ज्ञ म्हणतात. पण नेमके धोके काय असतात? ज्या पेयात 5 टक्क्यापेक्षा जास्त साखर असते त्यांना साखरयुक्त पेय म्हणतात. म्हणजे बाटलीबंद ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स, मिल्क शेक, सॉफ्ट ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी त्यात मोडतात.
 
Université Sorbonne Paris Cité या फ्रेंच विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलं होतं की रोज 100 मिलीलीटर एक्स्ट्रा साखरयुक्त पेय प्यायलो तर कॅन्सरचा धोका 18 पटींनी वाढतो.
 
पण याचा अर्थ साखरयुक्त पेय प्यायल्याने कॅन्सर होतो असा घ्यायचा का? तर नाही. अतिरिक्त साखर आणि कॅन्सर यांचा थेट संबंध जोडता येत नाही. पण त्या अतिरिक्त साखरेमुळे शरीरावर परिणाम होतात.
 
लठ्ठपणा हात्यातला एक महत्त्वाचा दुष्परिणाम आहे आणि लठ्ठपणाचा अनेक प्रकारच्या कॅन्सरशी संबंध असू शकतो त्यामुळे अशी अतिरिक्त साखर असलेली पेयं पिऊ नये असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
 
ब्रिटिश आणि अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात असं दिसून आलं होतं की दररोज सॉफ्ट ड्रिंक किंवा साखरयुक्त पेय पिणाऱ्या लोकांचं ब्लड प्रेशर अशी पेयं न पिणाऱ्यांपेक्षा जास्त होतं.
 
वजन, उंची असे फॅक्टर गृहित धरून त्यांचं गणित घातलं तरीही ही पेयं पिण्याचा आणि त्यामुळे बीपी वाढण्याचा थेट धोका दिसून आला.
 
अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणतं की एका आठवड्यात 335 मिली पेयाचे तीनच कॅन प्यावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती