तंदुरूस्ती कायम राखताना

बुधवार, 20 जानेवारी 2021 (15:57 IST)
हायपरटेन्शन हा शब्द अनेकदा तुमच्या कानी पडला असेल. हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही व्याधी पन्नाशीनंतर जडत असे. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेक तरुणांना उच्च रक्तदाबाने ग्रासलं आहे. धकाधकीचं जीवन, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार अशा कारणांमुळे जीवनशैलीशी संबंधित ही व्याधी खूप कमी वयात जडू लागली आहे. ताणतणाव,चिंता, काळजी ही तरुणांमधल्या वाढत्या उच्च रक्तदाबाची कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. प्रत्येक क्षेत्रातली प्रचंड स्पर्धा, भरपूर पैसा कमावण्याच्या उद्देशाने सुरू असणारी धडपड, कामाचे वाढलेले तास, स्वतःसाठी वेळ न मिळणं, डेडलाईनचा ताण यामुळे अशा दुर्धर व्याधी जडत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना तरुणांना स्वतःला वेळ देता येत नाही. वर्क फ्रॉम होम संस्कृतीत कामाचे तास वाढले आहेत. त्यामुळे व्यायामाला अजिबात वेळ मिळत नाही, अशी कारणं बरेच जण सांगत असतात. त्यातच पिझ्झा, बर्गर, कोल्डड्रिंकचं अतिसेवनही आरोग्याला हानिकारक ठरत आहे. एकेकाळी शहरांपुरती मर्यादित असणारी ही व्याधी आता लहान शहरं आणि गावांमधल्या तरुणांनाही आपल्या विळख्यात घेऊ लागली आहे.
 
उच्च रक्तदाबाची आनुवंशिक कारणंही आहेत. त्यामुळे तुमच्या घरात उच्च रक्तदाबाचा इतिहास असेल तर तिशी ओलांडल्यानंतर आरोग्य तपासणीला सुरूवात करा. एकदा का उच्च रक्तदाब जडला की औषधं आणि जीवनशैलीतले सकारात्मक बदल यांनीच त्यावर नियंत्रण ठेवता येतं. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजन कमी करणं आवश्यक आहे. तसंच धूम्रपान, मपानालाही अटकाव करायला हवा. यासोबतचमीठही कमी खायला हवं. निरोगी राहण्यासाठी जास्त मीठ असणारे पदार्थ खाऊ नयेत.
 
आयुष्यात ताणतणाव असले तरी त्यावर मात करता आली पाहिजे. उगाचच धावपळ करून आपलं आरोग्य बिघडवून घेण्यात काहीच अर्थ नाही. योगा, मेडिटेशन, धावण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करून तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
चिन्मय प्रभू

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती