डीजेच्या दणदणाटामुळे नाक आणि हृदयात काय घडतं ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो

सांगली येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
एक घटना तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे घडली तर दुसरी घटना वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली.
 
शेखर पावशे (वय 32) आणि प्रवीण शिरतोडे (वय 35) असे डिजेच्या आवाजामुळे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
 
नेमकं काय घडलं?
 
माध्यमांमधील बातम्यांनुसार, शेखर पावशे या तरुणाला काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचं निदान झालं होतं. त्याच्यावर काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. गावात सुरू असलेली गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तो गेला. यावेळी डीजे लावण्यात आला होता. दरम्यान, रात्री 10 च्या सुमारास जात असताना मोठ्या आवाजामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं.
 
यामुळं त्यानं घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी येताच तो चक्कर येऊन पडला. त्याच्या छातीत वेदना होत असल्याचे त्याने सांगितल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
 
दुधारी गावातील प्रवीण यशवंत शिरतोडे हा सोमवारी (25 सप्टेंबर) गावातील विसर्जन मिरवणुकीत गेला. या ठिकाणी डीजेचा मोठा दणदणाट सुरू होता. या आवाजात तो त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. दरम्यान, त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि तो खाली पडला. त्याच्या मित्रानी त्याला तातडीनं दवाखान्यात नेलं. मात्र, उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
 
तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात?
डॉ. अशोक पुरोहित सांगलीतील प्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ज्ञ आहेत.
 
ते सांगतात, “70 डेसिबल या मर्यादेपर्यंत आवाज कान सहन करू शकतात. 80 ते 100 डेसिबल मर्यादेचा आवाज सतत कानावर पडल राहिल्यास कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते.
 
“100 ते 120 डेसिबल दरम्यानच्या आवाजामुळे कानाचा पडदा फाटू शकतो, चक्कर येऊ शकते. या आवाजामुळे कानाची जी नस हृदयाला जोडलेली असते ती स्टिम्युलेट होते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडू शकतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.”
 
सार्वजनिक मिरवणुकांनंतर कानाच्या विकाराची समस्या घेऊन आलेल्या रुग्णांत वाढ झाल्याचंही डॉ. अशोक पुरोहित सांगतात.
 
ते सांगतात, “परवा 18 जण कानाशी संबंधित उपचारासाठी आले होते. यांतील बहुसंख्य लोक हे कार्यक्रते होते. मिरवणूक कार्यक्रम अटेंड करुन ते आले होते.”
 
हृदयविकार, डायबेटिस होण्याचा धोका
औरंगाबादचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. तुकाराम औटे सांगतात की, "ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणं, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अॅटॅक येणं किंवा स्ट्रोक सारखे त्रास होऊ शकतात."
 
"तसंच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, हृदयाची धडधड वाढते आणि हार्मोनच्या पातळीत बदल होतो. सतत मोठ्या आवाजात वावरलं तर जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो."
 
ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम
कान-नाक-घसा तज्ज्ञ असलेल्या डॉ. नीता घाटे सांगतात की, "सतत मोठा आवाज कानावर पडला तर बहिरं होण्याची शक्यता असते. मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते. त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. "
 
जितका जास्त काळ हा आवाज पडेल तितका धोका वाढत जातो. अनेकदा कानात सतत शिटी वाजल्यासारखे, मधमाशा गुणगुणल्यासारखे आवाज येतात. याला टीनीटस असं म्हणतात. ही परिस्थिती तात्पुरती असू शकते किंवा कायमस्वरूपीही."
 
मोठ्या आवाजामुळे होणारे बहिरेपणाचे किंवा कानाचे त्रास टाळता येण्यासारखे आहेत. त्यासाठी डॉल्बी डीजे वापरताना आवाजाची मर्यादा पाळायला हवी.
 
मानसिक आरोग्यावर परिणाम
डीजेच्या ठणठणाटामुळे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
 
कोल्हापूरमधल्या सायकोथेरेपिस्ट शुभांगी कारखानीस सांगतात, "संगीताविषयी प्रत्येकाची एक आवड-निवड असतो. ते ऐकताना त्याचा आवाज कमी असावा की जास्त हाही चॉईस असतो. पण डीजे-डॉल्बीवाल्या संगीताने फक्त झिंग येते. ते संगीत कानाला गोड वाटतच नाही.
 
"त्यामुळे हा ठणठणाट ऐकला की सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास म्हणजे चिडचिड वाढणं. याचा झोपेवरही परिणाम होतो आणि त्यामुळे माणसं अजूनच वैतागतात. माझा स्वतःचा असा अनुभव आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती