चार तास टीव्ही पाहणे वाढवू शकते पोटाच्या कर्करोगाचा धोका

टीव्ही पाहणे ताणतणाव कमी करण्याचे आणि वेळ घालविण्याचे उत्तम साधन आहे. त्यामुळे मनोरंजनही होते आणि नवनवीन माहितीही मिळते. मात्र गरजेपेक्षा जास्त टीव्ही पाहण्यासाठी एकजागी बसून राहणे घातक ठरू शकते. रोज चार तासांपेक्षा जास्त टीव्हीच्या समोर बसून राहिल्याने पुरुषांमध्ये आतड्याचा कर्करोग बळावण्याची शक्यता वाढते, असा धक्कादायक खुलासा एका ताज्या अध्ययनातून समोर आला आहे. सुमारे पाच लाख पुरुष आणि महिलांच्या माहितीचे विश्र्लेषण करून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. तब्बल सहा वर्षे या लोकांवर नजर ठेवण्यात आली. या अध्ययनात असे दिसून आले की, ज्या लोकांनी टीव्ही पाहण्यात कमी वेळ खर्च केला, त्यांच्यातील फारच थोडे लोक पुढे जाऊन आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले गेले. या अध्ययनात सहभागी लोकांपैकी 2391 जणांच्या आतड्यात कर्करोगाची सुरुवात झाली. फ्रान्समधील इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी), ब्रिटनधील इम्पिरियल कॉलेज लंडन आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्यासंबंधीच्या माहितीचे विश्र्लेषण करून आतड्याचा कर्करोग आणि तासन्‌तास टीव्ही पाहण्याची सवय यांच्यातील संबंध शोधून काढला. शारीरिक हालचालींचा पुरुषांमधील पोटाच्या कर्करोगाशी जवळचा संबंध असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती