Health : 'बॉडी' बनवण्यासाठी स्टेरॉईड घेतले तर सेक्स लाइफवर परिणाम होऊ शकतो का?

सोमवार, 19 डिसेंबर 2022 (19:06 IST)
Author,नीलेश धोत्रे
उंच, देखणा आणि चांगली शरीरयष्टी असलेल्या रजतने ( नाव बदलण्यात आलं आहे.) कॉलेज संपताच मॉडेलिंगच्या करिअरसाठी मुंबई गाठलं होतं. त्याला काही कामंही मिळाली.
 
मॉडलिंगमध्ये करिअर सुरू असतानाच ऐन पंचविशीत रजतला एका चित्रपटाची ऑफर आली. त्यासाठी त्याला पीळदार शरीरयष्टीची गरज होती.
 
रजतने लगेच जिमचा मार्ग धरला आणि जास्तीत जास्त वेळ जिममध्ये तो घालवू लागला. जिम ट्रेनरच्या मदतीने त्याने शरीरावर लक्ष केंद्रित केलं.
 
चांगलं शरीर कमावण्याच्या नादात कमी वेळात त्याने अनाबॉलिक स्टिरॉईड इंजेक्शन्स आणि ओरल सप्लिमेंट घेतले. तसंच त्याचा जास्तीत जास्त भर हा फक्त प्रोटिन डाएटवर होता.
 
दीडदोन महिन्यातच त्याने खूप परिश्रम करून चांगलं शरीर कमावलं. त्याच्या शरीरात चांगलाच बदल झालेला दिसून येत होता. फिल्मचा डायरेक्टर त्याच्यावर खूपच खूष होता.
 
पण खूप स्टेरॉईड घेतल्याचा त्याला नंतर मात्र त्रास झाला. जेव्हा त्याने स्टिरॉईड्स कमी केले तेव्हा लिंग ताठर होत नसल्याचं त्याला जाणवलं. मग त्याने पुन्हा जास्त स्टिरॉईड्स घेतले तेव्हा परिस्थिती पूर्ववत झाली होती.
 
पण जास्त स्टेरॉईड घेतलं नाही तर मात्र त्याच्या लिंगाच्या ताठरतेत बाधा येऊ लागली. त्याची सेक्स करण्याची इच्छासुद्धा मरू लागली होती.
 
आपण एका विचित्र परिस्थितीत अडकल्याचा अंदाज रजतला आला. कामावर लक्ष केंद्रित करणंसुद्धा कठीण जाऊ लागलं. सतत एकच विचार डोक्यात येऊ लागला.
 
त्याने थेट सेक्सॉलॉजिस्टला गाठलं. त्याने त्याची समस्या डॉक्टरांना सांगितली.
 
“लोकांना वाटतं की मी खूप देखणा आणि चांगली बॉडी कमावल्यामुळे माझी लैंगिक क्षमता फार चांगली असेल, पण तसं अजिबात नाही. माझ्या लिंगात ताठरताच येत नाही. मला सेक्स करण्याची इच्छासुद्धा होत नाही. मला काय कारवं ते आता समजत नाही. मी माझं पौरुषत्व गमावून बसलो आहे का?” असा प्रश्न त्याने डॉक्टरांना केला.
 
डॉक्टरांनी सर्वांत आधी रजतचं समुपदेशन केलं. ही स्थिती सुधारू शकते असं सांगून त्याला दिलासा दिला. अनाबॉलिक स्टेरॉईड आणि ओरल सप्लिमेंटमुळे रजतला इरेक्टाईल डिस्फंशन झालं होतं. म्हणजेच लिंगामध्ये ताठरता येणं बंद झालं होतं.
 
डॉक्टरांनी सर्वांत आधी रजतला स्टेरॉईडचे अतिरिक्त डोस बंद करण्याचा सल्ला दिला. तसंच त्याच्या डाएटमध्ये बदल घडवून आणला. फक्त प्रोटिन डाएटवरून त्याला चौरस आहारावर आणलं.
 
पण तरीही पुढच्या 2 महिन्यांमध्ये काहीच फरक पडला नाही. तेव्हा मात्र डॉक्टरांनी काही औषधं सुरू केली. सहा महिन्यांपर्यंत रजतने नियमित औषधोपचार घेतले. त्यानंतर मात्र रजतची स्थिती पूर्वपदावर आली.
 
चांगलं शरीर कमावण्यासाठी स्टेरॉईडची गरज असते का?
मुळात पीळदार शरीरयष्टी म्हणजे काय? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली. सर्वांत आधी चांगलं शरीर म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया...
 
चांगलं शरीर म्हणजे ज्या शरीरात मसल म्हणजेच स्नायूंचं प्रमाण जास्त आहे आणि फॅटस् कमी आहे. म्हणजेच लठ्ठपणा कमी आहे.
 
लवकर शरीर कमावण्याच्या नादात पुरूष काही चूका करतात, असं सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सागर मुंदडा सांगतात.
 
पुरूष सर्वांत पहिली चूक करतात ते अनावश्यक इंजेक्शन आणि सप्लिमेंटच्या नादी लागतात. तसं अजिबात न करण्याचा सल्ला डॉ. मुंदडा देतात.
 
अनेकदा पुरूष लवकर चांगलं शरीर तयार करण्यासाठी तासंतास जिममध्ये घालवतात. ते योग्य नाही. याचा शरीरावर विपरीत परिणाम होते. म्हणून हळूहळू स्टॅमिना आणि जिमचा कालावधी वाढवावा, असा सल्ला डॉक्टर देतात.
 
स्टेरॉईड आणि लैंगिक क्षमतेचा काय संबंध आहे?
याबाबत डॉ. मुंदडा सांगतात, “पुरुषाच्या शरीरात नैसर्गिक पद्धतीने काही हार्मोन्स तयार होत असतात. ज्यामुळे त्याची संभोग करण्याची इच्छा होत असते. तसंच त्याची लैंगिक क्षमत मजबूत होत जाते.
 
पण जेव्हा तो बाहेरून अनाबॉलिक स्टेरॉईड घेतो तेव्हा त्याचा परिणाम या हार्मोन्सवर होतो. ते सतत घेत राहिलं तर पुरुषाच्या वृषणांचा आकार कमी होण्याची शक्यता असते. ज्याचा स्पर्म काऊंटवर विपरीत परिणाम होतो.
 
या अनाबॉलिक स्टेरॉईडचा सर्वांत महत्त्वाचा परिणाम होतो तो म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाच्या ताठरतेवर परिणाम होतो. सेक्स करण्यासाठी लिंगात जेवढी ताठरता आवश्यक असते तेवढी संभोग पूर्ण होईपर्यंत कायम राहत नाही.”
 
इरेक्टाईल डिस्फंक्शनची स्थिती उद्भवली तर सर्वांत आधी तुम्ही घेतल असलेलं स्टेरॉईड पूर्णपणे बंद करा. अनेकदा यातून पूर्णपणे बरं होण्यासाठी तीन महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो. डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार यामध्ये फार महत्त्वाचा आहे.
 
जिममध्ये व्यायाम करताना चांगलं शरीर कमावण्यासाठी स्टेरॉईड गरजेचं नाही. ते घेऊ नये, असा ठाम सल्ला मुंबईस्थित आहार तज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी देतात. कुठलाही डॉक्टर ते घेण्याचा सल्ला देणार नाही याची त्या आठवण करून देतात.
 
पण जर का अपवादात्मकस्थितीत स्टेरॉईड घेण्याची वेळ आलीच तर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यावं.
 
"त्याचा प्रोटोकॉल आहे आणि तो डॉक्टरांना माहिती असतो. त्याआधी काही ब्लड टेस्ट आणि इतर टेस्ट करण्याचीही गरज असते," असं डॉ. शिल्पा जोशी सांगतात.
 
चांगल्या बॉडीसाठी आहार किती महत्त्वाचा?
आणखी एक चूक पुरूष करतात ती म्हणजे रात्रंदिवस पुरूष फक्त प्रोटिन डाएटवर जगतात किंवा फक्त प्रोटिन शेकच पितात दुसरं काहीच खात नाहीत. ते टाळावं असं डॉक्टर सांगतात.
 
“चांगल्या शरीरासाठी हायप्रोटिन डाएट घेणं योग्य राहील. अंडी, मांस, हिरव्या भाज्या, डाळी, कडधान्य, स्टिरॉईड नसलेले प्रोटिन सप्लिमेंट घेऊ शकता,” असं डॉ. मुंदडा सांगतात.
 
मुंबईतले फिटनेस ट्रेनर समीर जौरा वेगवेगळ्या सेलिब्रिटिंना ट्रेनिंग देण्यासाठी ओळखले जातात. फरहान अख्तर, प्रियंका चोप्रा, शाहीद कपूर यांना त्यांच्या सिनेमांसाठी समीर यांना ट्रेन केलं आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते हे काम करत आहेत.
 
डॉ. सागर यांच्या प्रमाणेच ते चौरस आहार घेण्यावर भर देतात. चांगलं शरीर कमावण्यासाठी ते स्टेरॉईटचं समर्थन अजिबात करत नाहीत. ते त्याचा सल्ला कधीच कुणाला देत नसल्याचं सांगतात.
 
‘भाग मिल्का भाग’ सिनेमातल्या फरहान अख्तर यांच्या शरिरयष्टीची तेव्हा चांगली चर्चा झाली होती.
 
त्याबाबत सांगताना समीर म्हणतात, “तसं शरीर कमावणं सोपं नाही. त्यासाठी फरहान यांनी किमान दीड वर्ष अथक परिश्रम घेतले होते. ही काही एक दोन महिन्यात होणारी गोष्ट नाही. चांगलं शरीर कमावण्यासाठी चांगला आहारसुद्धा गरजेचा आहे. त्यात कर्बोदकं, प्रथिनं, तंतुमय, स्निग्ध पदार्थांचं सोग्य प्रमाण असावं.”
 
अर्थात एका संपूर्ण टीमच्या देखरेखीखाली सिनेमासाठी ऍक्टर्सचं ट्रेनिग होतं, ही गोष्ट इथं समीर अधोरेखीत करतात.
 
तर डाळी, दूध, भाज्या आणि फळं सामान्यतः व्यायाम करणाऱ्या माणसांसाठी गरजेचं आहे. त्यातून प्रोटिनची गरज पूर्ण होते. पण त्याचवेळी बाहेरचं खाणं बंद करावं आणि पॅकेट फूड टाळावं, असा सल्लासुद्धा डॉ. शिल्पा देतात.
 
चांगलं शरीर कमावण्याच्या नादात काय करू नये?
अनाबॉलिक स्टेरॉईड पूर्णपणे टाळा. स्टेरॉईड असलेल्या सप्लिमेंट घेऊ नका. गरज नसताना ग्रोथ हॉर्मोनची इंजेक्शन घेऊ नयेत. डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच कुठलीही सप्लिमेंट घ्यावीत, असं तज्ज्ञ सांगतात. आजकाल 18-20 वर्षांची मुलं चांगल्या शरिरयष्टीलाठी शॉर्टकटची विचारणा करतात. पण त्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. त्यांना मी अजिबात प्रोटिन किंवा इतर सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देत नाही. या वयात नैसर्गिकपणे हार्डवर्क करून चांगली बॉडी कमावता येऊ शकते, असं समीर बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.
 
पीळदार शरीरयष्ठी कमावण्यासाठी साधारणतः 5 ते ७ वर्षांचा कालावधी लागतो. हे प्रत्येकाच्या शरीर आणि आहारावर अवलंबून असल्याचं समीर सांगतात.
 
प्रोटिन सप्लिमेंट घ्यावं की नाही?
आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी यांच्या मते, “जिममध्ये व्यायाम करताना जर तुम्हाला मसल गेन म्हणजेच स्नायू बळकट करण्यासाठी प्रोटिन पाहिजेच, त्यात प्रोटिन गरजेचं आहे यात दुमत नाही. पण भारतीय जेवणातून ते योग्य प्रमाणात मिळतीलच असंसुद्धा नाही.
 
"अगदी मांसाहारी माणसं सुद्धा आपल्याकडे रोज मांसाहार करत नाहीत. अनेकदा वार पाळले जातात. त्यामुळे मग प्रोटिन सप्लिमेंटची गरज भासते. पण ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत,” शिल्पा जोशी सांगतात.
 
कुठातरी प्रोटिनचा डबा महाग आहे म्हणजे चांगला आहे आणि कुठलातरी स्वस्त आहे म्हणजे चांगला नाही, असं नसतं, त्यासाठी डॉक्टर काय सांगतात हे फार महत्त्वाचं आहे.
 
तसंच डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट मार्केटमध्ये जाऊन अशी उत्पादनं घेणं जोखमीचं ठरू शकतं, असं डॉक्टर शिल्पा जोशी सांगतात.
 
समीर डॉ. शिल्पा यांचं म्हणण पुढे नेत बाजारत उपलब्ध असलेल्या ड्युप्लिकेट प्रोडक्टविषयी सूचित करतात. त्याचे साईडईफेक्ट होऊ शकतात. म्हणून त्याचंही म्हणणं आहे की प्रोटिन सप्लिमेंट तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.
 
पण जीममध्ये येणाऱ्या प्रत्येकालाच प्रोटीन सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिलाच जातो असं नाही. समीर त्यांच्या सर्वच क्लायटला त्याचा सल्ला देत नाहीत.
 
प्रोटीन सप्लिमेंट घेतली तर त्याचे फायदे आणि तोटे काय होऊ शकतात. तसंच ते गरजेचं आहे का, हे आम्ही लोकांना समजावून सांगतो आणि मगच त्याचा सल्ला देतो. तरीही ती घ्यावी की नाही हे लोकांनी ठरवायचं असतं, असं समीर सांगतात.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती