डोळ्यांच्या कोरडेपणाकडे करू नका दुर्लक्ष, कोरडेपणा कमी करण्यासाठी 'हे' नक्की वाचा

सोमवार, 1 जुलै 2024 (08:51 IST)
डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा परंतु तितकाच दुर्लक्षिला गेलेला अवयव आहे. शरीराची निगा राखताना डोळ्यांकडे थोडसं दुर्लक्षंच होतं. रोजच्या धावपळीत देखील चेहरा, केस यासारख्या गोष्टींकडे लक्ष पुरवलं जातं मात्र डोळ्यांकडे कानाडोळा होतो.
 
डोळ्याचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं असतं किंबहुना जरा अधिकच महत्त्वाचं असतं. कोरड्या डोळ्यांच्या समस्येशी निगडीत विविध मुद्दे आणि उपाय जाणून घेऊया.
 
तुमच्या डोळ्यांना वारंवार सूज येते का? ते लाल होतात का? त्यांना खाज सुटते का? त्यातून पाणी गळतं का? आणि प्रकाशाकडे पाहताना तुम्हाला त्रास होतो का?
यापैकी काही समस्या असेल तर, तुम्हाला कोरड्या डोळ्यांची समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
 
तुलनात्मकरित्या हा सौम्य आजार आहे. तो साधारणपणे 5 ते 40 टक्के लोकांना होतो. डोळे कोरडे होण्याची समस्या ही जरी आरोग्याच्या दृष्टीनं खूप गंभीर बाब नसली तरी अशाप्रकारचा डोळ्यांचा आजार झाल्यावर तुम्हाला खूपच अस्वस्थ वाटू शकतं.
आपल्या डोळ्याच्या बुबुळावरील आवरण किंवा पडदा हा अतिशय नाजूक असतो आणि त्याची रचना खूप गुंतागुंतीची असते. डोळ्याच्या बुबुळावर एक खास प्रकारचे आवरण किंवा पडदा असतो. त्याला टिअर फिल्म (tear film) असं म्हणतात. या पडद्यात झालेले गंभीर स्वरुपाचे बदल किंवा त्याला झालेला अपाय याचा परिपाक म्हणजे कोरड्या डोळ्यांची समस्या.
 
डोळ्याच्या बुबुळावरील हा पडदा तीन थरांचा बनलेला असतो. यातील पहिला थर म्हणजे लिपिड थर (lipid layer), दुसरा थर म्हणजे पाण्याचा थर (water layer) आणि तिसऱ्या थराला म्युकोसल थर (mucosal layer) म्हणतात. या प्रत्येक थराचं वैशिष्ट्यं आणि स्वत:चं असं कार्य असतं.
डोळ्यावरील तीन थरांच्या या पडद्यामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे बदल होऊ शकतात. यातून पुढे कोरड्या डोळ्यांची समस्या निर्माण होते.
 
हे तिन्ही थर एकत्रितपणे काम करत डोळ्याच्या बुबुळावरील पृष्ठभाग म्हणजे बाह्य बाजू स्वच्छ ठेवतात. तसंच त्याला एकप्रकारे वंगण पुरवण्याचं काम करतात. या तीनपैकी कोणत्याही थरामध्ये अडथळा आला किंवा त्याला काही इजा झाली तर डोळे कोरडे होऊ शकतात.
 
डोळ्याच्या पडद्यावर कसा परिणाम होतो?
यूकेमधील साऊथम्पटन विद्यापीठातील नेत्ररोगशास्त्र (ophthalmology) विभागाचे प्राध्यापक परवेझ हुसेन यांच्या मते, टिअर फिल्म किंवा बुबुळावरील पडद्याचं काम बिघडण्याचं किंवा ते अकार्यक्षम होण्यामागचं सर्वांत सामान्य कारणं म्हणजे मिबोमियन ग्रंथीनी (meibomian gland) नीट काम न करणं.
 
त्याचबरोबर इतरही कारणं आहेत. शरीराच्या रोगप्रतिकार व्यवस्थेत समस्या निर्माण होऊन त्या व्यवस्थेनं शरीरातील निरोगी पेशींना शरीराबाहेरील घटक समजून त्यावर हल्ला चढवल्यामुळे (autoimmune diseases)आणि काही विशिष्ट प्रकारची औषधं घेतल्यामुळेसुद्धा बुबुळावरील पडद्याचं काम अपेक्षेनुरुप होत नाही किंवा तो नीट काम करत नाही.
याशिवाय कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करणं आणि शरीरातील हार्मोनल बदलांमुळे देखील बुबुळावरील पडद्यावर परिणाम होऊ शकतात.
मिबोमियन ग्रंथी डोळ्यावरील पापण्यांमध्ये असतात. या ग्रंथीमधून लिपिड म्हणजे विशिष्ट असा द्रव स्त्रवतो ज्यातून बुबुळावरील पडदा किंवा टिअर फिल्म तयार होते. या ग्रंथींमुळे त्या पडद्यातून या लिपिडचं बाष्पीभवन होण्यास प्रतिबंध होतो. म्हणजे या ग्रंथी एकप्रकारे लिपिडचं संरक्षण करतात.
 
प्राध्यापक हुसेन पुढे सांगतात, "मात्र जेव्हा मिबोमियन ग्रंथी नीट काम करत नाहीत, तेव्हा बुबुळावरील पडदा अस्थिर होतो. या ग्रंथीमधूनच लिपिडचा पुरवठा होत असतो आणि त्यातून तो पडदा तयार होत असतो. मात्र लिपिडचा पुरवठाच न झाल्यामुळे हा पडदा अपेक्षेपेक्षा लवकर नष्ट किंवा नाहीसा होतो."
 
अशा परिस्थितीत संपूर्ण पडद्याचं नुकसानसुद्धा होऊ शकतं किंवा डोळ्यातून अश्रू येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
 
डोळ्यांत कोरडेपणा का येतो?
काही प्रारंभिक लक्षणांसह कोरड्या डोळ्यांच्या समस्येमुळं इतरही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामध्ये दृष्टी अस्पष्ट होणे, डोळे लाल होणं यासारख्या समस्या असतात.
 
बाहेरील वातावरणाचा शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांवरसुद्धा परिणाम होत असतो. त्यामुळे वातावरणातील कोरडेपणा, वाहणारा वारा किंवा धूळ यासारख्या बाह्य घटकांमुळं या लक्षणांमध्ये वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे खूप वेळ डिजिटल उपकरणांवरील स्क्रीन पाहणं आणि मोबाईल फोनचा वापर करणं यामुळे कोरड्या डोळ्यांची समस्या आणखी बिकट होऊ शकते.
 
अलिकडे आपण सर्वजण कामासाठी कॉम्प्युटरचा वापर करत असतो. एरवी आपण जितके वेळा डोळे मिचकावत असतो म्हणजे आपल्या पापण्यांची जितक्या वेळा उघडझाप होत असते त्यापेक्षा आपण जेव्हा कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहत असतो तेव्हा पापण्यांची उघडझाप किंवा डोळे मिचकावणं कमी होतं.
 
डोळे मिचकावणं किंवा पापण्याची उघडझाप होणं ही एक महत्त्वाची क्रिया असते. यामुळं आपले डोळे स्वच्छ होतात आणि डोळ्यातून अश्रू आल्यास ते समान रीतीनं पसरले जातात.
मात्र जेव्हा पापण्यांची उघडझाप किंवा डोळे मिचकावणं कमी होतं तेव्हा बुबुळावरील पडद्याचं बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया अधिक वेगानं होऊ लागते.
 
मध्यमवयीन लोकांना कोरड्या डोळ्याची समस्या अधिक होते. सर्वसामान्यपणे पुरुषांच्या तुलनेत महिलांना ही समस्या अधिक होते.
 
"आमच्या अभ्यासात असं आढळलं की, जे लोक पन्नाशीत आहेत त्यांना कोरड्या डोळ्यांची समस्या अधिक प्रमाणात होते. खासकरून ज्या महिलांची रजोनिवृत्ती (मेनोपॉज) जवळ आलेली असते त्यांना कोरड्या डोळ्यांची समस्या होते," असं हुसेन सांगतात.
 
ते पुढे सांगतात, "शरीरात हार्मोनल बदल झाल्याचा मिबोमियन ग्रंथींवर परिणाम होतो."
 
मात्र, हुसेन हे देखील स्पष्ट करतात की, डिजिटल उपकरणांच्या अती वापरामुळे (कॉम्प्युटर, मोबाइल फोन इत्यादी उपकरणांच्या स्क्रीनचा खूप वेळ वापर केल्यामुळे) लहान वयातच डोळे कोरडे होण्याची समस्या उद्भवू लागते.
 
कोरड्या डोळ्यांच्या समस्येमागची मुख्य कारणं सध्याच्या जीवनशैलीशी निगडीत आहेत. जीवनशैलीतील बदलाच्या मुद्द्याचा प्रभाव तर सर्वत्रच दिसून येतो आहे. साहजिकच कोरड्या डोळ्यांची समस्या असणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे.
 
समस्या कशी टाळायची?
मायो क्लिनिक (Mayo Clinic) ही अमेरिकेतील एक स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था क्लिनिकल प्रॅक्टिस, अध्यापन आणि क्लिनिकल संशोधन, या औषधं आणि उपचार पद्धतींशी निगडित क्षेत्रात काम करते.
 
कोरड्या डोळ्यांच्या समस्येला प्रतिबंध करण्यासाठी मायो क्लिनिकनं काही सूचना केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे,
 
डोळ्यांचा जोरदार हवा किंवा वाऱ्याशी संपर्क टाळा.
आपल्या सभोवतालची हवा जेव्हा खूपच कोरडी असते तेव्हा डोळ्यात पुरेशी आर्द्रता आणण्यासाठी ह्युमिडीफायरचा वापर करावा.
सतत पाहण्याचं काम खूप वेळ करत असताना (डिजिटल उपकरणांच्या स्क्रीन पाहणं) डोळ्यांना मधूनमधून विश्रांती दिली पाहिजे.
कोरड्या वातावरणात (उदाहरणार्थ विमानात) बुबुळावरील पडद्याचं बाष्पीभवन कमी करण्यासाठी वारंवार डोळे मिचकवा किंवा पापण्यांची उघडझाप करा.
कॉम्प्युटरची स्क्रीन डोळ्याच्या पातळीखाली ठेवा. म्हणजे तिरळेपणाची समस्या उद्भवणार नाही
धूम्रपान सोडा आणि इतर कोणी धूम्रपान करत असल्यास त्यांच्याजवळ जाऊ नका.
कोरड्या डोळ्यांवरील उपचारांबाबत हुसेन सांगतात की, डोळ्यांमध्ये आर्द्रता निर्माण करण्यासाठी डोळ्यात टाकायच्या औषधाचा म्हणजे आय ड्रॉप्सचा (eye drops)वापर केला जाऊ शकतो.
ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं यासंदर्भात सल्ला दिला आहे की, "कोमट पाण्यात भिजवलेल्या स्वच्छ कापडानं डोळ्याच्या पापण्या स्वच्छ कराव्या आणि डोळ्यांभोवतीच्या भागावर हळूवार दाब द्यावा."
 
डोळ्यांभोवती असणाऱ्या ग्रंथी तेलकट पदार्थ तयार करतात त्याला सेबम (Sebum) म्हणतात. वर सांगितलेले उपाय केल्यामुळं हा तेलकट पदार्थ निघून जाण्यास मदत होते.
 
ते अशीही सूचना करतात की , पापण्यांना तुमच्या बोटांच्या साहाय्यानं किंवा कापसाच्या बोळ्यानं हळुवार मालिश करावी. जेणेकरून ग्रंथीमधून सेबम हा तेलकट पदार्थ बाहेर काढला जाईल.
 
या सोप्या उपायांमुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती