नवीन वर्षाचा संकल्प म्हणून आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वैयक्तिक प्रशिक्षक हा माणसांची जागा घेऊ शकेल का?
“मी यापूर्वी कधीही जिममध्ये पाऊल सुद्धा ठेवलं नव्हतं,” असं एआय फिटनेस सॉफ्टवेअर कंपनी मॅजिक एआयचे मुख्य कार्यकारी वरुण भानोत म्हणाले.
"मला जिमची खूप भीती वाटायची. ते खूप महागडं प्रकरण आहे आणि जेव्हा तुम्हाला तिथे जाण्यासाठी प्रवास करावा लागतो तेव्हा ते गैरसोयीचं ठरतं.”
वजन कमी करा अन्यथा शारीरिक समस्यांना सामोरं जा, असं जेव्हा काही वर्षांपूर्वी मिस्टर भानोत यांना सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मदतीने स्वत:च्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणलं - अर्थात एका माणसाच्या मदतीने.
परंतु मिस्टर भानोत यांच्या लक्षात आलं की, लोकांना स्वत:च्या घरात सहज उपलब्ध असलेल्या एआय फिटनेस चॅटबॉटच्या सल्ल्याने त्यांची जीवनशैली अधिक निरोगी बनवता येऊ शकते. म्हणून 2021 साली त्यांनी मॅजिक एआयची सुरूवात केली.
मॅजिक मिरर हे त्यांचं मुख्य उत्पादन आहे, हा टच-स्क्रीन मिरर एआयच्या मदतीने मानवी स्वरूपात ट्रेनरचा व्हिडिओ देखील प्ले करतो.
"तुम्ही जेव्हा लॉग इन करता आणि तुमचा सर्व शारीरिक तपशील त्यामध्ये टाकता, तेव्हा एका मानवी खाजगी प्रशिक्षकाप्रमाणे एआय तुमच्यासाठी वैयक्तिक कार्यक्रम तयार करतो,” असं मिस्टर भानोत सांगतात.
एआय ट्रेनर लाउडस्पीकरद्वारे तुमच्याशी बोलू शकतो आणि कॅमेऱ्यांचा वापर करून तुमच्या व्यायामाच्या हालचालींना पाहून ताबडतोब अभिप्राय आणि सूचना देतो. तुमच्या प्रगतीचं मूल्यमापन करून तो नवीन व्यायामप्रकार तयार करतो.
जागतिक पातळीवर तंदुरुस्ती आणि आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर वाढत चाललाय. एका अहवालातील अंदाजानुसार 2022 मध्ये याचं बाजारमूल्य $7.8 बिलियन होतं आणि 2030 पर्यंत ते $35.6 बिलियनवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
एआयचा वापर करणाऱ्या फिटनेस अॅप्सची संख्या दिवसेंदिवेवस वाढत चाललेय आणि त्यामध्ये Aaptiv, FitnessAI, Fitbod, Freeletics, VI Trainer आणि Whoop यांचा समावेश आहे. दरम्यान, काही लोकं लोकप्रिय एआय चॅटबॉट चॅटजीपीटी ला त्यांच्यासाठी वर्कआउट्स तयार करायला सांगत आहेत.
एआयवर चालणाऱ्या फिटनेस अॅप्सच्या वाढलेल्या वापरावरून असं लक्षात येतंय की, काही लोकांना माणसांपेक्षा संगणकाशी संवाद साधणं अधिक सोयीस्कर वाटू लागलंय. तर काही जणांना स्वत:चा खाजगी प्रशिक्षक आपल्या खिशात असणं हे सोयीचं वाटत असावं.
परंतु माणसांमधील संवादातून मिळणा-या प्रोत्साहनाची जागा एआय खरोखरंच घेऊ शकतं का? व्यायाम प्रशिक्षक आणि फिजिओथेरपिस्ट एस्थर फॉक्स यांना असं वाटत नाही.
"लोकांना त्यांच्या ओळखीच्या आणि विश्वासू व्यक्तींशी बोलायचं असतं," असं त्या म्हणतात. “त्यासाठी मला एआयचा वापर करता येणार नाही."
लोकांशी संवाद केल्याने परिणाम साधता येऊ शकतो, असं मिस फॉक्स म्हणतात. “आपलं म्हणणं कुणीतरी ऐकतंय हे जेव्हा लोकांना समजतं तेव्हा ते तुमचं ऐकतात - आणि ते तुम्ही सांगाल त्याप्रमाणे करतात,” असं त्या म्हणतात, हा एक अतिशय मानवी अनुभव आहे.
"आरोग्य आणि तंदुरूस्ती राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता असते ज्याची जागा एआय घेऊ शकत नाही."
याउलट, ब्रिटीश धावपटू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या डेसिरी हेन्री या मॅजिक एआय फिटनेस मिररच्या स्क्रीनवर दिसणार्या एआय प्रशिक्षकांचा आवाज आणि शरीरांपैकी एक आहेत.
"तुम्ही घरी एकट्याने व्यायाम करत असालात तरी व्यायाम करताना तुमच्यासोबत पूर्णवेळ कुणीतरी आहे, असं तुम्हाला वाटतं.”, असं त्या म्हणतात.
मिस्टर भानोत म्हणतात की, जिमची संकल्पना मोडीत काढणं हा आमचा उद्देश नाही, तर त्याच्याबरोबरीने पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, “उदा. नेटफ्लिक्स आणि सिनेमा, फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट्स. जी लोकं परिवर्तनशीलता आणि सोयींना महत्त्व देतात त्यांच्यासाठी एआय आणखीन एक पर्याय उलब्ध करून देतो”.
बहुतांश एआय फिटनेस अॅप्स गोष्टी एकटेपणाने करण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेल्या असताना, आता अशाप्रकारची पहिली जिम सुरू झाली आहे जिथे एआय प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षित केले जाणारे सर्वजण एकत्रिपणे व्यायाम करू शकतात.
डॅलस, टेक्सास येथील ल्युमिन फिटनेसच्या अंधाऱ्या स्टुडिओच्या जागेत भिंतींवर एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत जिथे एआय वैयक्तिक प्रशिक्षक एकावेळी जिममधील 14 जणांना वैयक्तिक वर्कआउट्स किंवा टप्प्याटप्प्याने कठीण होत जाणारं प्रशिक्षण देतात.
प्रत्येक व्यक्तीला एक जागा नेमून दिलेली असते जिथे मास्क सेन्सर्स स्क्रीन असतात, जे व्यायाम करणार्याच्या हालचाली टिपतात, तसेच जिमसाठी खास तयार करण्यात आलेली उपकरणं, ज्यात डंबेल, मेडिसिन बॉल आणि दोरीउड्यांची दोरी यांचा समावेश असतो.
त्यानंतर त्यांना हेडफोनद्वारे एआय कडून तोंडी अभिप्राय मिळतो.
"स्टुडिओमधील सेन्सर्सद्वारे वर्गातील प्रत्येक सदस्यावर लक्ष ठेवलं जातं, त्यांच्या फॉर्मचं निरीक्षण केलं जातं आणि प्रत्येक हालचालीवर अभिप्राय दिला जातो," असं सह-संस्थापक आणि लुमिन फिटनेसचे मुख्य कार्यकारी ब्रँडन बीन सांगतात.
असं असलं तरी, वर्गात एक मानवी प्रशिक्षक देखील हजर असतो. "आम्ही प्रशिक्षकांच्या प्रतिभेची जागा घेण्याचा प्रयत्न करत नाही आहोत,” असं मिस्टर बीन सांगतात. “चांगल्या अनुभवासाठी आम्ही त्यांना उपकरणं देत आहोत."
"समुदायाला एकत्रित ठेवण्यासाठी प्रशिक्षक खूप महत्त्वाचा असतो. जे प्रत्यक्षात एकमेकांना टाळ्या देतात, एकमेकांसोबत हसतात. काही गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही."
फिजिओथेरपिस्ट लुसी मॅकडोनाल्ड म्हणतात की, "एआय योग्यरित्या प्रोग्राम केलं असल्यास, लोकांच्या व्यायामातील प्रगतीमध्ये मदत करण्याबाबत मला त्यात मोठया प्रमाणात क्षमता असल्याचं दिसून येतं”.
पण त्या इशारा देतात की, एआय नेहमीच सर्व गोष्टी योग्यप्रकारे करू शकत नाही आणि त्यामुळे लोकांनी प्रशिक्षण किंवा दुखापतीचा धोका पत्करण्यापूर्वी मानवी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
मिस्टर बीन यांचं म्हणणं आहे की, एआय फिटनेस अॅप्समध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत राहतील. “व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहता हा अगदी सुरूवातीचा काळ आहे," असं ते म्हणाले. "परंतु एआयचं एक सर्वोत्तम वैशिष्ट्य म्हणजे त्याची शिकण्याची क्षमता. ते आता परिपूर्ण नाही, पण जसजसं ते शिकत जाईल तसतसं कालांतराने एआय फिटनेस अधिक प्रभावी आणि चांगलं होत जाईल."